करोनाची लागण झालेल्या संशयित रुग्णांच्या चाचण्यांसाठी राज्यातील तीन प्रयोगशाळांवर मोठा ताण आला असून रुग्णांचे रिपोर्ट्स यायलाही वेळ लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी चार ते पाच प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली.

आणखी वाचा- करोनाची लक्षणं आढळलेल्यांचीच चाचणी होणार – आरोग्यमंत्री

टोपे म्हणाले, “राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणच्या केवळ तीनच प्रयोगशाळांमार्फतच करोना विषाणूग्रस्तांच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, या प्रयोगशाळांवरील वाढता ताण लक्षात घेता मुंबईतील केईएम रुग्णालय, जे. जे. रुग्णालय आणि हाफकिन इन्स्टिट्यूट या ठिकाणीही करोनाच्या चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. बहुधा पुढील पाच दिवसांत ते आपलं काम सुरु करतील.” त्याचबरोबर राज्यातील विविध भागांमध्येही यासारख्या प्रयोगशाळा सुरु करण्यात येतील अशी माहितीही त्यांनी दिली.

आणखी वाचा- Coronavirus: ‘तो’ मेसेज पूर्णपणे खोटा, आरोग्य विभागाकडून मोठा खुलासा

सोशल मीडियावरील करोनाच्या रक्त चाचणीच्या रुग्णालयांची यादी खोटी

सोशल मीडियावर सध्या करोनाच्या रक्त चाचणीसाठी राज्यातील रुग्णालयांची यादी व्हायरल होत आहे. मात्र, ही यादी खोटी असून करोनाच्या तपासणीसाठी रक्ताची कुठलीही चाचणी केली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. तसेच संशयित रुग्णांची रक्ताची चाचणी न करता घशाचा द्राव (नसो फैरिंजीयल स्वाब) घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. राज्यात मुंबई, पुणे व नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.