Maharashtra Political News: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना टप्प्या टप्प्याने सुरुवात झाली आहे. यामध्ये सर्वात आधी नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही सध्या तापलेले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून झालेल्या बेबनावामुळे अनेक ठिकाणी राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिवसभरातील पाच चर्चेतील राजकीय विधानांचा आढावा घेऊया.

“तर नक्कीच कारवाई केली जाईल”

मुंबईमधील वांद्रे येथील किल्ल्यावरील मद्य पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकार, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, या घटनेवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

वांद्रे किल्ल्यावर दारुपार्टीच्या व्हिडीओबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या घटनेचा व्हिडीओ मी पाहिलेला नाही. पण मला काही लोकांनी याबाबत सांगितले. जर अशा प्रकारे पार्टीसाठी परवानगी दिली गेली असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल.”

“निवडणूक लढविण्यासाठी पैसा…”

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष एकत्र दिसण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधील स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे.

“निवडणूक लढविण्यासाठी पैसा महत्त्वाचा असला तरी केवळ पैशाने निवडणूक जिंकता येत नाही, त्यामुळे कोणीही स्वतःला बाहुबली समजू नये”, असा सूचक इशारा प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी दिला. त्यांनी हे वक्तव्य करताना कोणाचेही नाव घेतलेले नसले तरी त्यांचा थेट भाजपाला इशारा असल्याचे बोलले जात आहे.

“३ डिसेंबरला आमचा गुलाल व फटाके…”

राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीची लगबग चालू झाली आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मालवण नगरपरिषदेत शिवसेना (एकनाथ शिंदे) व भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात प्रचार सुरू केला असून त्यांनी भारतीय जनता पार्टीला आव्हान दिले आहे.

ते म्हणाले, “मालवण नगरपरिषदेची निवडणूक लागली आहे. येथील स्थानिक शिवसेना आमदार म्हणून मी काम करत आहे. शिवसेनेने या भागात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्याचे आम्हाला निवडणुकीत फळ मिळेल. आम्ही भाजपाकडे बघत नाही. मुळात आम्ही भाजपाकडे का पाहू? आमची या भागात मोठी ताकद आहे. आमचे फटाके आणि गुलाल बघायची तयारी ठेवा. येत्या ३ तारखेला तुम्हाला आमचे फटाके व गुलाल पाहायला मिळेल.”

“ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचे सरकार”

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने तब्बल २०२ जागा जिंकत मोठा विजय मिळवला, तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त ३५ जागांवरच समाधान मानावे लागले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना बिहारच्या निवडणुकीबाबत भाष्य केले. ‘ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले’, अशी खोचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

“असे आहे की आपले मुख्यमंत्री म्हणाले की जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनण्यामागचे राज आजपर्यंत कोणी समजू शकलेले नाही. बिहारच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांचे अभिनंदन. मात्र, एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते की तेजस्वी यादव यांच्या सभेला जो मिळणारा प्रचंड प्रतिसाद होता, मग तो प्रतिसाद खरा होता की एआयने तयार केलेली माणसे होती, हे आता कळेना झालेय. म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्याचे सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचे सरकार येते. या नवीन लोकशाहीतील हे गणित कळण्याच्या पलिकडचे आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

“त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे आणि…”

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, काँग्रेस पक्षाने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेसवर नाराज आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे, त्याबाबतची घोषणा काँग्रेसने केली आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे आणि माझा पक्ष स्वतंत्र आहे”, असे एका वाक्यात उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.