Wrestler Sikandar Shaikh: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरीत सहभागी झालेला पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्रांच्या तस्करी प्रकरणात अटक केली आहे. यामुळे राज्यातील कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली. राजस्थानमधील पपला गुर्जर या आंतरराज्यीय टोळीशी सिंकदरचे संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. मात्र सिंकदरला या प्रकरणात गोवण्यात आले आहे आहे, असा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे. तर वडील रशीद शेख यांनी पंजाब पोलिसांना विनंती करून सिकंदरची सुटका करावी, असे आर्जव केले आहे.
वडील रशीद शेख माध्यमांशी बोलताना म्हणाले, “माझ्या मुलाने काहीही चुकीचे केलेले नाही. माझे पंजाब पोलिसांना आवाहन आहे की, त्यांनी माझ्या मुलाला सोडून द्यावे. मला अद्याप या प्रकरणाची काहीही माहिती पोलिसांकडून मिळाली नाही. सिकंदरने आजवर सर्व कष्टाने मिळवले आहे. सिकंदरशिवाय आम्हाला कोणताही आधार नाही.”
सिकंदर शेख अजून चार ते पाच वर्ष कुस्ती खेळू शकतो. आम्ही खूप कष्टाने पुढे आलो आहोत. आमच्या लेकरावर अन्याय करू नका. महाराष्ट्र केसरी पासून त्याने राष्ट्रीय पातळीवरची पदके मिळवली. लष्करातही तो भरती झाला. पंजाब पोलिसांना माझी कळकळीची विनंती आहे की, सिकंदरला सोडून द्यावे. सिकंदरला जर कुणी अडकविण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनाही विनंती करतो की, गरीबाच्या लेकराला अडकवू नका, असे भावनिक आवाहन रशीद शेख यांनी केले.
हिंद केसरी स्पर्धा जवळ आल्यामुळे…
पंजाब पोलिसांनी केलेल्या आरोपांवर बोलताना रशीद शेख म्हणाले, “आमच्या धर्मात चुकीच्या कामांना थारा नाही. मी आजवर हरामचा पैसा कमावला नाही, तर माझा मुलगा कुठून असे काम करणार? माझ्या मुलावर पंजाबनेही प्रेम केले आहे. त्याने पंजाबमध्ये अनेक कुस्त्या खेळल्या आहेत. हिंद केसरी जवळ आल्यामुळे त्याच्यावर काहीतरी संकट आले असावे.”
पैशाच्या हव्यासातून कृत्य – वस्ताद दीनानाथ सिंह यांची खंत
सिकंदर शेखने कोल्हापूरमधील ज्या तालमीत कुस्तीचे धडे घेतले, त्या तालमीतील प्रशिक्षक दीनानाथ सिंह यांनी सिकंदरच्या अटकेनंतर आश्चर्य व्यक्त केले. आमच्या तालमीला न भरून येणारी जखम झाली आहे. आमच्या तालमीचा संबंध छत्रपती शाहू महारांजाशी आहे. पैशांची लालसा असल्यावर हातून अशा चुका घडतात. सिकंदर एवढ्या खालच्या स्तराला जाईल, असे कधी वाटले नव्हते. त्याने असे करायला नको होते.
अवैध तस्करीचे प्रकरण काय?
पंजाबमधील मोहाली पोलिसांनी शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींचा पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी पाच पिस्तूल, जिवंत काडतुसे, रोख रक्कम आणि दोन वाहने जप्त केली. अटक केलेल्यांपैकी दानवीर (२६) आणि बंटी (२६) हे दोघे उत्तर प्रदेशमधील आहेत. कृष्ण कुमार उर्फ हॅप्पी गुर्जर (२२) हा मोहालीचा रहिवासी आहे. तर सिकंदर शेखही (२६) सध्या मोहाली येथे राहण्यास होता.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक हरमनदीप सिंग हंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुथरा येथील दोघजण मोहाली येथे शस्त्र घेऊन येणार आहेत, अशी गुप्त माहिती खरारच्या सीआयए कर्मचाऱ्यांना २४ ऑक्टोबर रोजी मिळाली होती. या माहितीच्या आधारे खरार-मुल्लानपूर विमानतळ रस्त्यावर संशयितांना पोलिसांनी रोखले. त्यांच्याकडे शस्त्रसाठा सापडल्यानंतर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.
