संगमनेर : सहकार, ग्रामीण विकास, दूध व्यवसाय, आर्थिक समृद्धी, कृषी, शिक्षण आणि निळवंडे धरणाचे पाणी देऊन या भागामध्ये समृद्धी निर्माण करण्याचे काम माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. या नेतृत्वाने तालुक्याला प्रथम क्रमांकाचे बनवताना राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यांच्यासारखा मोहरा विधानसभेत नसणे ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी खंत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केले.
डिग्रस येथे संत बुवाजी बाबा यांच्या आध्यात्मिक सोहळा यात्रेत खासदार राऊत बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, रणजीतसिंह देशमुख, महंत बुवाजीबाबा पुणेकर, उमाजीबाबा पुणेकर, बबन सांगळे, डॉ. जयश्री थोरात, शंकर खेमनर, शिवसेनेचे अमर कतारी, संजय फड, पप्पू कानकाटे आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, माजी मंत्री थोरात यांनी पाणी आणि शिक्षण देऊन या भागाला राज्यात प्रथम क्रमांकाचे बनवले. या विभागाच्या विकासात आणि राज्याच्या विकासात काम करणाऱ्या या नेतृत्वाचा पराभव कुणालाही मान्य होणारा नाही. ते विधानसभेत नसणे ही महाराष्ट्राची मोठी खंत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अत्यंत चांगले काम राज्य सरकारने केले. करोना संकटात महाराष्ट्राला वाचवले. मात्र, खोटेपणा आणि गद्दारी करून सरकार पाडले गेले.
महाराष्ट्रात आता बदलाची प्रक्रिया सुरू झाली असून, आगामी काळामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी थोरात यांच्यासारख्या बुलंद नेतृत्वाच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन करताना जनतेचे काम करणारे हे नेतृत्व असून, पैसे वाटणारे येतात आणि जातात त्यांना किंमत देऊ नका, असेही ते म्हणाले.
माजी मंत्री थोरात म्हणाले, डिग्रसचे देवस्थान श्रद्धास्थान आहे. येथे शेकडो बकऱ्यांची बळी देण्याची परंपरा होती. परंतु, संत नारायण गिरी महाराज यांचा सप्ताह या ठिकाणी झाला आणि ही प्रथा बंद झाली. मी शिक्षणमंत्री असताना या परिसरामध्ये शाळा सुरू केली आणि त्या माध्यमातून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन काम करत आहेत. निळवंडे धरण आणि कालवे आपण पूर्ण केले हे सर्वांना माहीत आहे. ज्यांचे योगदान नाही ते आता जलनायक म्हणून घेण्यासाठी पुढे येत असले तरी जनतेला खरे माहिती आहे. केंद्रात आणि राज्यात मत चोरी करून सरकार सत्तेवर आले आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याकरता विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. आगामी काळामध्ये जातीयवादी पक्षांना थारा न देता सर्वांनी महाराष्ट्राच्या हिताकरिता मानवता धर्म जोपासत महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.