परभणी – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत हमखास यश मिळावे, या दृष्टीने नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्टा करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.

येथील अक्षदा मंगल कार्यालयात शनिवारी (दि. १९)आयोजित निर्धार नव पर्वाचा या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी शहराध्यक्ष प्रताप देशमुख आदींसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना तटकरे म्हणाले, मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आम्ही कार्यकर्त्यांच्या बळावर जोरदार यश मिळविले आहे. आता दीर्घ प्रतिक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयांचा आढावा, सभासद नोंदणी आणि संघटना बांधणी यासाठी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकाही ईव्हीएमच्या माध्यमातूनच झाल्या मात्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममुळे पराभव झाल्याचे विरोधकांचे म्हणणे म्हणजे रडीचा डाव असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, विरोधकांनी खोटा अपप्रचार करुन संभ्रम पेरण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, ही योजना बंद तर होणारच नाही, मात्र त्यात निश्‍चित झाली तर मानधनात वाढ होईल, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओळखून पुढील काळात संघटनात्मक दृष्टीने अधिकाधिक समाज घटकांना सोबत जोडण्याचे प्रयत्न गरजेचे आहेत. स्थानिक नेतृत्वाने, पदाधिकार्‍यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यास सत्तेत कशी संधी मिळेल, त्याद्वारे पक्ष कसा बळकट होईल, असे प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच पक्ष भक्कमपणे वाटचाल करेल व या जिल्ह्यात बालेकिल्ला म्हणून उभा राहिल, असा विश्‍वास यावेळी तटकरे यांनी व्यक्त केला. आगामी निवडणूकीत तरुणांना विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर, माजीमंत्री मुंडे, आमदार विटेकर, प्रताप देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.