सांगली : पहिली उचल ३७०० रुपयांची मागणी असताना राजारामबापू साखर कारखान्याने उसाला जाहीर केलेला ३२०० रुपयांचा पहिला हप्ता अमान्य असून याविरुध्द स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी शनिवारी दिला.

खराडे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जयसिंगपूर येथे घेण्यात आलेल्या ऊस परिषदेत पहिली उचल ३७०० रुपयांची मागणी केली आहे.सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा १०.५० आहे, तरीही त्यांनी पहिली उचल ३५०० रुपये जाहीर केली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्याचा साखर उतारा बाराच्या पुढे आहे त्यामुळे ३७०० रुपये जाहीर करायला काहीच हरकत नाही. मात्र ती भूमिका घ्यायला जिल्ह्यातील साखर कारखानदार तयार नाहीत. गेल्या वर्षीही जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी योग्य दर दिला नाही.

हेही वाचा…अवकाळीचा फटका, कोल्हापुरात उस जमीनदोस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेली वर्षभर साखरेचा दरही चांगला राहिला. मात्र अनेक कारखान्यांनी पहिल्या उचलीनंतर शेवटचा हप्ता दिलेला नाही. साखरेची आधारभूत किंमत सध्या ३१ रुपये आहे. ती वाढविण्यासाठी साखर कारखानदारांनी लढण्याची भूमिका घ्यावी, त्या लढाईत आम्हीही खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहोत. साखरेची आधारभूत किंमत ३१ रुपयांवरून ३५ रुपये झाल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. मात्र साखर कारखानदार या प्रश्नावर संघर्ष करायला तयार नाहीत हे वास्तव आहे जिल्ह्यातील ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांनी प्रयत्न करून या प्रश्नी साखर कारखानदार, शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक घ्यावी आणि तोडगा काढावा किंवा कारखानदारांनी आपापली पहिली उचल जाहीर करून कोंडी फोडावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले.