अहिल्यानगर: ‘जलजीवन मिशन’ कार्यक्रमातील पूर्ण झालेल्या पाणी योजनांचे ग्रामपंचायतींनी हस्तांतरण करून घेण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काढले आहेत. पुढील महिन्यात, ऑगस्टमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये जलजीवन मिशनमधील पाणी योजनांच्या हस्तांतरणासह इतर सात विषय घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.
केंद्र सरकारपुरस्कृत जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवला जात आहे. जिल्हा परिषदेमार्फत ८३० योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कार्यक्रमात पाणीयोजनांबद्दल अनेक तक्रारी आहेत. वेळोवेळी झालेल्या सभांमधून या विषयावर गदारोळ निर्माण झाला. ठिकठिकाणच्या योजनांबद्दल आंदोलने झाली आहेत. त्यामुळे ग्रामसभांमधून या पाणी योजनांच्या हस्तांतरणाबद्दल कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष राहणार आहे.
दर वर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यंदा होणाऱ्या ग्रामसभांमधून सात विषय घेण्याचा आदेश सीईओ भंडारी यांनी दिला आहे. त्यामध्ये जलजीवन मिशनमधील पूर्ण झालेल्या पाणी योजनांचे हस्तांतरण या वादग्रस्त विषयासह जिल्ह्यातील ग्रामपंचायती बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प, वृक्षलागवडीचा कार्यक्रम प्रत्येक गावात यशस्वी करणे, नागरिकांना आपले सेवा केंद्रातून ३० शासकीय विभागांतील ५९३ सेवांबाबत माहिती देऊन संबंधित सेवा ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करणे, घनकचरा विलगीकरण व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत प्रत्येक गावातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करणे, विकसित महाराष्ट्र व्हीजन-२०४७ असे विषय ग्रामसभेत मांडण्याचा आदेश गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे.