भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे सोलापुरात हळहळ व्यक्त होत असून, यानिमित्ताने मुंडे यांचे सोलापूरशी असलेल्या ऋणानुबंधाला उजाळा मिळाला आहे. मुंडे यांचे विद्यार्थिदशेपासूनचे सोलापूरशी संबंध होते. ३० वर्षांपूर्वी मुंडे हे सोलापुरात स्थानिक मित्रांसमवेत चक्क दुचाकीवर बसून फिरायचे. शहर व जिल्हय़ात आमदार व खासदारपद मिळविण्यामागे मुंडे यांनी घातलेली पक्षसंघटनेची मजबूत बांधणी ही पायाचा दगड ठरली आहे.
हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीच्या वैभवाच्या काळात सत्तरच्या दशकात मुंडे हे मराठवाडय़ाला खेटून असलेल्या सोलापूर शहरात खास चित्रपट पाहण्यासाठी येत असत. नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम करताना त्यांचा सोलापूरशी संबंध आला. पुढे दिवंगत वसंतराव भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाची धुरा सांभाळताना दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याबरोबरीने मुंडे यांचाही संबंध वाढत गेला. त्यातून पक्षाची बांधणी होत असताना १९८५ सालच्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निश्चित करताना मुंडे यांची भूमिका निर्णायक होती. त्या वेळी त्यांचे संघटनकौशल्य प्रथमच सोलापूरकरांना पाहावयास मिळाले. माजी नगरसेवक दिवंगत डॉ. इक्बाल रायलीवाला, विश्वनाथ बेंद्रे, लिंगराज वल्याळ आदी सवंगडी मिळाले. मुंडे यांनी विशेषत: बहुजन समाजातील अनेक कार्यकर्त्यांना पक्षात आणले व त्यांना मानाचे स्थान दिले. लिंगराज वल्याळ यांच्यासारख्या तेलुगू भाषक कार्यकर्त्यांला महापालिकेत १९८५ साली पुलोद प्रयोगाच्या वेळी स्थायी समितीचे सभापतिपद मिळाले व पुढे १९९० साली वल्याळ यांना सोलापूर शहर उत्तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मातब्बर नेत्याला पराभवाची धूळ चारून निवडून आणण्यात मुंडे यांचे राजकीय कौशल्य महत्त्वाचे ठरले. नंतर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्लाच बनला. सोलापूरबरोबर अक्कलकोटमध्येही संघटना बांधणी केल्यामुळे १९९५ साली तेथून बाबासाहेब तानवडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांला आमदार होता आले. आजही अक्कलकोटमध्ये भाजपची आमदारकी कायम आहे. त्यामागे मुंडे यांच्या राजकीय संघटनकौशल्याचा भाग महत्त्वाचा समजला जातो.
साखरपट्टा समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापित काँग्रेस नेत्यांचे आव्हान पेलताना मुंडे यांनी भाजपची शक्ती वाढविण्यासाठी प्रस्थापित घराण्यांमधील काही नेत्यांनाच भाजपमध्ये आणले होते. यात छत्रपती शिवाजीमहाराजांचे तेरावे वंशज असलेले सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले व अकलूजचे माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचा प्रामुख्याने समावेश होता.      
प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना नंतर २००३ सालच्या सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत प्रथमच भाजपचा खासदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळाला. ही किमया केवळ मुंडे यांच्यामुळे साधली गेली. सोलापूर शहर व ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्त्यांशी मुंडे यांचा थेट संपर्क होता. पक्षाशी संबंध नसलेल्या काही मंडळींशीही मुंडे यांचे ऋणानुबंध जपले होते. राजवाडे चौकातील नामदेव चिवडेवाले कोंडेवार मामा हे तर मुंडे यांना दैवतच मानत. १९९३ साली मुंडे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस शासनाच्या विरोधात संघर्षयात्रा काढली होती, त्या वेळी शहर व जिल्हय़ात मिळालेला प्रतिसाद म्हणजे मुंडे यांच्यातील लोकनेतेपदावर शिक्कामोर्तब करणारा होता. पुढे २००२ साली सोलापुरात जातीय दंगल झाली, तेव्हा मुंडे हे धावून आले होते. त्या वेळी त्यांनी दंगलीची पाश्र्वभूमीची माहिती घेऊन निष्क्रिय पोलीस प्रशासनामुळे दंगल कशी उसळली, याचा लेखाजोखा जाहीर सभेत मांडला होता.