जव्हार-मोखाडय़ातील प्रश्न पुन्हा गंभीर; बालमृत्यू आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष शिबिरे
गेल्या वर्षी जव्हार-मोखाडा परिसरातील बालमृत्यूंमुळे खडबडून जागी झालेली सरकारी यंत्रणा यंदा मात्र पावसाळ्याच्या तोंडावर कमालीची सावध झाली आहे. बालमृत्यूंना आळा घालण्यासाठी दर पंधरवडय़ाला आरोग्य शिबिरे सुरू करण्यात आली असून पहिल्याच आठवडय़ात वाडा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा या पट्टय़ात आदिवासी कुटुंबातील १५ टक्के मुले अतिकुपोषित गटात मोडत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
राज्यातील कुपोषित बालकांची समस्या पालघर जिल्ह्य़ात भीषण आहे. वाडा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा या पट्टय़ातील आदिवासी कुटुंबातील मुले कुपोषणाचा बळी ठरतात. गेल्या वर्षी पावसाळ्यात कुपोषित मुलांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाल्यानंतर सामाजिक, राजकीय क्षेत्रात उठलेले वादळ व सामान्यांचा रोष लक्षात घेऊन राज्य सरकारने वारेमाप घोषणा केल्या होत्या. रोजगारासारख्या दीर्घकालीन उपायांमध्ये एक पाऊलही पुढे पडले नसले तरी पावसाळ्यात वाढणारे मृत्यू आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने ‘पुनरागमन आरोग्य तपासणी’ शिबिरे सुरू केली आहेत. गेल्या वर्षी मृत्यू झालेल्या बालकांपकी बहुतेक जणांचे पालक पावसाळ्याआधी रोजगारासाठी ठाणे, नाशिक येथे गेले होते. तेथून परतलेल्या कुपोषित मुलांच्या आहार, आरोग्याकडे विशेष लक्ष दिले गेले नसल्याने जुलाब, ताप अशा सामान्य आजारांनाही ही मुले बळी पडली. यानंतर सर्वच स्तरावर झालेला निषेध लक्षात घेऊन यावेळी आरोग्य विभागाकडून जून ते ऑक्टोबर या चार महिन्यांत दर पंधरवडय़ाला हे शिबीर घेण्यात येईल.
गेल्या चार महिन्यांत झालेल्या आरोग्य शिबिरांमधून ६४८१ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यातील १४९३ म्हणजे २३ टक्के बालके अतिकुपोषित तर २९४५ बालके कमी वजनाची आढळली. आता आरोग्य विभागाने पावसाळ्याच्या तोंडावर परतलेल्या मुलांसाठी विशेष आरोग्यशिबिरे आयोजित केली आहेत. गेल्या आठवडय़ात १५ जून रोजी जव्हार येथे घेतलेल्या शिबिरात जव्हार, वाडा, विक्रमगड, मोखाडा या चार तालुक्यांतील ६३२ मुलांना व ८५ गर्भवती स्त्रियांची तपासणी करण्यात आली. त्यापकी ९५ अतिकुपोषित तर ४४८ कमी वजनाची आढळली. २१ जूनला डहाणू, पालघर, कासा व तलासरी परिसरात घेतलेल्या आरोग्यशिबिरात तपासण्यात आलेल्या ६८९ मुले व १७१ गर्भवती स्त्रियांपकी ८३ अतिकुपोषित तर १३२ कमी वजनाची मुले आढळली.
मुंबईतील काही खासगी रुग्णालयांच्या समन्वयाने आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरांमधील कुपोषित मुले व स्त्रियांच्या आहार व आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती पालघर जिल्ह्य़ाच्या सिव्हिल सर्जन डॉ. कांचन वाणेरे यांनी दिली.
आरोग्य शिबिरांतील वास्तव..
- जव्हार, वाडा, विक्रमगड व मोखाडा : ६३२ मुलांपकी ९५ अतिकुपोषित, ४४८ कमी वजनाची.
- डहाणू, पालघर, कासा, तलासरी : ६८९ मुलांपकी ८३ कुपोषित, १३२ कमी वजनाची.
तीन महिने पगार नाही
आरोग्यमोहिमांना धडाक्यात सुरुवात करण्यात आली असली तरी कुपोषित मुले व त्यांच्या कुटुंबांशी थेट जोडल्या गेलेल्या अंगणवाडी सेविकांचा पगार व अंगणवाडीचा निधी मात्र गेल्या तीन महिन्यांत आलेला नाही. मुलांना रोज अंडे, केळे व खिचडी द्यावी लागते. मात्र हा सर्व कारभार उसनवारीवर चालत आहे. माझ्या तीन महिन्यांच्या साठलेल्या नऊ हजार रुपये मानधनातले दीड हजार रुपयेच काल जमा झाले, अंगणवाडीचा निधी तर अजून आलेलाच नाही, असे मोखाडय़ातील ३९ मुलांची अंगणवाडी चालवणाऱ्या सेविकेने सांगितले. निधीच नसल्याने पगार देण्यात आले नव्हते, मात्र आता निधी आला आहे, असे पालघरच्या आरोग्य अधिकारी म्हणाले.