पुणे-बंगळुरु महामार्गावर रस्त्याकडेला थांबलेल्या जीपला मालट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात इंदापूर तालुक्यातील दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. कराडनजीकच्या मलकापूर येथे  रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले होते, मात्र नाकाबंदी करून ट्रक पकडला परंतु, चालकाने ट्रक सोडून पोबारा केल्याने त्याचा शोध जारी आहे.

शिवाजी हरिभाऊ मेहेर (वय ५०, रा. सुरवड, ता. इंदापूर, जि. पुणे), प्रशांत पोपट मोरे (वय ४०, रा. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत तर यशवंत तानाजी कोरटकर (रा. सुरवड) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताची खबर जीपचालक गोपाळ गणपत म्हेत्रे (रा. माळवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जीपचालक गोपाळ म्हेत्रे व यशवंत कोरटकर हे रेशीम कोश घेऊन गडहिंग्लज येथे पोहोचवण्याकरिता निघाले होते. त्यांच्यासोबत प्रशांत मोरे व शिवाजी मेहेर हेही जीपमध्ये होते. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरून ते कोल्हापूर बाजूकडे गडहिंग्लजला जात असताना मलकापूर शहराच्या हद्दीत रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर त्यांनी लघुशंकेसाठी रस्त्याकडेला जीप थांबवली. सर्व जण लघुशंका करून जीपमध्ये बसत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या वीस चाकी मालट्रकने जीपला जोराची धडक दिली. या अपघातात शिवाजी मेहेर हे जागीच ठार झाले. तर प्रशांत मोरे व यशवंत कोरटकर हे गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रशांत मोरे यांचा मृत्यू झाला. तर कोरटकर यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सांगली जिल्ह्यतील कासेगाव पोलिसांच्या मदतीने महामार्गावर पेठ ते नेर्ले या दरम्यान नाकाबंदी करून ट्रक पकडला. मात्र, चालकाने ट्रक तेथेच सोडून पोबारा केल्याने त्याचा शोध घेण्यात येत आहे.