सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कालावल खाडी किनाऱ्यावर महसूल विभागाने अनधिकृत वाळू उपशावर मोठी कारवाई केली आहे. बांदिवडे गावाजवळ बेकायदेशीरपणे वाळू काढण्यासाठी तयार केलेले सात रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

मालवणच्या प्रभारी तहसीलदार प्रिया हर्णे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कालावल खाडीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने तातडीने ही कारवाई केली. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईत प्रभारी तहसीलदार प्रिया हर्णे यांच्यासह मसुरेचे मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंगरे, श्रावण चव्हाण, अजय परब, संतोष गुरखे, मीनल चव्हाण, एस. एस. जंगले, संतोष जाधव, भागवत, सचिन चव्हाण आणि वर्षा रामाने आदी महसूल विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होते.

या कारवाईला स्थानिक पोलीस प्रशासन आणि बंद अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. यापुढेही अनधिकृत वाळू उपसा किंवा असे रॅम्प आढळल्यास ते तात्काळ उद्ध्वस्त केले जातील, असा इशारा मसुरेचे मंडळ अधिकारी डी. व्ही. शिंगरे यांनी दिला आहे. महसूल विभागाच्या या कठोर भूमिकेमुळे परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.