मीरा-भाइंदर वसई विरार पोलिसांनी नुकताच एका हत्येचा छडा लावला असून त्यातून एखाद्या चित्रपटातील कथानकात शोभाव्यात अशा घडामोडी समोर आल्या आहेत. २ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास उत्तन बीचवर एका सूटकेसमध्ये एक शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन तपास सुरू केला होता. अखेर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्रिशूळच्या एका टॅटूमुळे पोलिसांना या गुन्ह्याचा उलगडा करता आल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
२ जून रोजी सकाळी ८ वाजता उत्तन बीचवर एक बेवारस सूटकेस सापडली. बीचवर साफसफाई करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बॅग आली. जेव्हा त्यांनी ती उघडली, तेव्हा त्यात एका तरुणीचा मृतदेह असल्याचं दिसून आलं. धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहाचं शीर गायब होतं. तसेच, मृतदेहाचे दोन तुकडे करून तो सूटकेसमध्ये भरण्यात आला होता. मृतदेह भरलेली सूटकेस नंतर समुद्रात सोडून देण्यात आली होती.
टॅटू दिसलं आणि सूत्रं हलली!
मृतदेहाचं शीर गायब असल्यामुळे मृतदेह कुणाचा? याची ओळख पटवण्यापासून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आसपास बेपत्ताच्या तक्रारींचा शोध घेण्यात आला. या मृतदेहाचं शीर जरी गायब होतं, तरी त्यावरच्या काही खुणा पोलिसांना मदत करणाऱ्या ठरल्या. सर्वात महत्त्वाचं ठरलं ते मृतदेहाच्या हातावर असणारं टॅटू. या तरुणीच्या डाव्या हातावर त्रिशूळ, डमरू आणि ओमचं टॅटू होतं. याचा आधार घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर काढले होते ‘न्यूड सेल्फी’; पोलिसांना म्हणाला, “होय मी….”
टॅटू आर्टिस्टचा शोध आणि गुन्हेगार सापडला!
पोलिसांनी आसपासच्या भागात तब्बल ४० टॅटू आर्टिस्ट्सची चौकशी केली. यानंतर तो टॅटू नेमका कुणी काढला होता, याचा छडा पोलिसांना लागला. या टॅटू आर्टिस्टच्या मदतीने पोलिसांना या तरुणीचं नाव अंजली सिंह असल्याचं समजलं. ती नायगाव परिसरात राहणारी होती. पोलिसांनी तिच्या घराचा पत्ता शोधून तपास केला, तेव्हा तिचा पती ३१ वर्षीय मंटू गायब असल्याचं पोलिसांना समजलं. मंटू मूळचा बिहारचा असून तो जवळच्या भागात सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करत होता.
पोलिसांनी लागलीच मंटूचा शोध सुरू केला. सर्व यंत्रणांना त्यासंदर्भात माहिती देण्यात आली. ९ जून रोजी मंटू पोलिसांना दादर रेल्वे स्थानकावर महाराष्ट्राबाहेर जाणारी एक ट्रेन पकडताना सापडला.
मंटूचा कबुली जबाब आणि तपास पूर्ण!
मंटूला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्यातून गुन्ह्याचा छडा लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंटूनं २४ मे रोजी अंजलीची हत्या केल्याची कबुली दिली. त्याचं आणि अंजलीचं मोठं भांडण झालं. अंजलीचं विवाहबाह्य प्रेमप्रकरण असल्याचा संशय मंटूला होता. या भांडणात आपण अंजलीला भिंतीच्या दिशेनं ढकललं आणि तिचं डोकं भिंतीवर जोरात आदळल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असं मंटूनं आपल्या कबुलीजबाबात सांगितलं.
गुन्हा लपवण्यासाठी केलं कारस्थान
दरम्यान, अंजलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मंटूनं त्याचा मोठा भाऊ चुनचुन (३५) याची मदत घेतली. अंजलीची ओळख पटू नये, म्हणून त्यांनी तिचं शीर कापलं आणि उरलेल्या मृतदेहाचे दोन तुकडे करून ते एका सूटकेसमध्ये भरून उत्तनच्या समुद्रात सोडून दिले. यानंतर मंटूनं त्याच्या एक वर्षाच्या मुलीला अंजलीच्या पालकांकडे नेपाळमध्ये सोडलं आणि आपलं सामान घेण्यासाठी तो पुन्हा मुंबईत आला होता. यावेळी दादरहून परत जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली.