लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : पत्नी नांदण्यासाठी सासरी परत येत नाही, सासूनेही उद्धार केल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या जावयाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. याप्रकरणी सासू व पत्नीसह तिची सख्खी बहीण असलेली भावजय आणि विवाह जुळविणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे ही घटना घडली.

परशुराम महादेव देवकते (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील महादेव शिवप्पा देवकते यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मृत परशुराम याची सासू शिवगंगा मधुकर येलगुंडे (रा. मराठा वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) व पत्नी भूमिका, तिची सख्खी बहीण असलेली मृत परशुराम याची भावजय आणि विवाह जुळवलेल्या लक्ष्मण मनगेणी देवकते (रा. मंद्रूप) या चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी वाचा-Sanjay Raut: “त्याचाही एन्काऊंटर करा, आम्ही पाठिंबा देऊ”, संजय राऊत यांचे शिंदे-फडणवीसांना आव्हान

मृत परशुराम आणि त्याचा भाऊ रवी या दोघांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. परशुरामची पत्नी भूमिका आणि रवी याची पत्नी श्रद्धा या दोघी सख्ख्या बहिणी आणि जावा आहेत. परशुराम यास संस्कृती नावाची मुलगी आहे. परंतु पत्नी भूमिका ही विभक्त राहण्यासाठी हट्ट धरत होती. याच कारणावरून गेल्या एप्रिलमध्ये सासू शिवगंगा हिने दोन्ही मुली भूमिका आणि श्रद्धा यांना माहेरी आणले. पुन्हा नांदण्यासाठी प्रयत्न केला असता, तिने दाद दिली नाही. परशुराम याने वकिलामार्फत नोटीस पाठविली असता, आई-वडिलांना गावात सोडून सोलापुरात येऊन राहणार असेल तर नांदते, असे उत्तर तिने पाठविले होते. आई-वडिलांना सोडून पत्नीबरोबर राहण्यास परशुराम तयार नव्हता. त्याला सोलापुरात सासरी मारहाणही झाली होती. मुलगी संस्कृती हिला भेटण्यासाठी आतूर असताना तिला भेटू दिले जात नव्हते. त्यामुळे परशुराम वैफल्यग्रस्त झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मंद्रूपमध्ये घरात कोणीही नसताना परशुराम याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीमध्ये सासू शिवगंगा, पत्नी भूमिका, तिची सख्खी बहीण श्रद्धा आणि लक्ष्मण मनगेणी देवकते या चौघांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.