पंढरपूर : पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अधिकारी व कर्मचारी यांना मुखपट्टी बंधनकारक केली आहे. मात्र दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी स्वत:चे व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी. तसेच भाविकांना मुखपट्टी सध्या सक्तीची नाही, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे. दरम्यान, भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात येताना मुखपट्टीचा वापर करावा असे आवाहन समितीने केले आहे.

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रात करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी पुन्हा नव्याने येत असलेल्या करोना बाबत खबरदारीचे कोणते उपयायोजना करावेत, याबाबत चर्चा झाली. यामध्ये समितीने हे निर्णय घेतले असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली. शुक्रवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांना मुखपट्टी बंधनकारक केली आहे. मात्र सध्या तरी भाविकांना मुखपट्टी लावणे बंधनकारक केले नाही. दर्शनाला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन समितीने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडे जर मुखपट्टी नसेल, तर मंदिर समिती ज्या ठिकाणी दर्शन रांग सुरू होते त्या ठिकाणी मोफत मुखपट्टी देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. ज्या मुळे दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली जाणार आहे. तसेच मंदिरात दर्शन रांगेत योग्य ते अंतर व इतर नियमांचे पालन केले जाणर असल्याचे ठोंबरे यांनी माहिती दिली. असे असले तरी पंढरीच्या सावळय़ा विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी मुखपट्टी व करोनाच्या नियमाचे पालन करून सतर्क राहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केले आहे.