राहाता : कोपरगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या मनेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७ वीपर्यंतच्या वर्गांना केवळ तीनच शिक्षक असल्याने पालकांनी आपली मुलं शाळेत पाठवली नाहीत. मंजूर शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतल्याने विद्यार्थ्यांविनाच शिक्षकांना शाळा भरवावी लागली.
मनेगाव शाळेत दोन पदवीधर शिक्षक मंजूर असतानाही एकही शिक्षक अद्यापही हजर झालेला नाही. त्यामुळेच पालकांनी मुले न पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग कोल्हे यांनी दिली. मनेगाव शाळेत इयत्ता एक ते पाचवीपर्यंत ८१, तर सहावी व सातवीच्या वर्गात २५ विद्यार्थी आहेत. एक वर्षापूर्वी सहावी व सातवीला दोन शिक्षक मंजूर होते, त्यातील एक शिक्षक पदोन्नती मिळाल्याने बदलून गेले. त्यामुळे वर्गांसाठी एकच शिक्षक शिल्लक राहिले होते. मात्र, नवीन बदल्यांमध्ये राहिलेला एक शिक्षकही बदलून गेल्याने या वर्गांसाठी पदवीधर शिक्षकच शिल्लक राहिले नाही.
प्रशासनाकडून तीनच शिक्षकांना सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तोंडी दबाव सुरू केल्याने पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला. पालकांनी एकत्र येत आपली मुले शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी शाळेत शिक्षक नसल्याची तक्रार प्रभारी गटशिक्षण अधिकारी शबाना शेख यांना दिली. तरीही दखल घेतली नसल्याचा आरोपही पालकांनी केला.
पालकांनी विद्यार्थी शाळेत न पाठवल्याने शिक्षण विस्तार अधिकारी वाकचौरे व केंद्र प्रमुख लांडे यांनी शाळेला भेट देत एक पदवीधर शिक्षक देत असल्याचे तोंडी सांगितले. हक्काचे दोन शिक्षक मिळालेच पाहिजे, या मागणीवर पालक ठाम राहिल्याने कोंडी कायम राहिली. यावेळी सरपंच अण्णासाहेब गांगवे, सुखलाल गांगवे, मच्छिंद्र गोऱ्हे, भगिरथ झिंजुर्डे, जनार्दन गोऱ्हे, अमोल गोऱ्हे, संतोष गांगवे, शहाजी झिंजुर्डे, सोमनाथ झिंजुर्डे, योगेश कालेवार एकनाथ जाधव, मच्छिंद्र आढाव, दिलीप आढाव, हिरामण आढाव, पोपट आढाव, बाळासाहेब आढाव, प्रकाश कालेवार, संपत मोरे, विशाल माळी, दीपक कोल्हे, सागर गोधडे साईनाथ जाधव, नवनाथ जाधव, मनोज लहामगे तसेच पालक उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतून जिल्ह्यात वारंवार असे प्रसंग उद्भवत आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या झाल्या. सुमारे पावणेपाच हजार शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी प्रशासनाने कार्यमुक्त केले आहे. समायोजनाची प्रक्रिया न झाल्याने शिक्षकांच्या नियुक्तींमध्ये असमानता निर्माण झाली आहे.