सध्याच्या घडीला अनेक जण त्यांच्या नोकरीला कंटाळतात. वेगळा मार्ग अवलंबतात. काहीजण निवृत्त होण्याची वाट न पाहता स्वेच्छा निवृत्तीही घेतात. मात्र साताऱ्यातल्या कराडमध्ये रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजी यांची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. कराडच्या नांदगावमध्ये वयाच्या ६५ व्या वर्षी मंगला आवळे या आजी रिक्षा चालवत आहेत. त्यांचं धाडस आणि जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

मुलाच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आजी चालवतात गाडी

मुलाच्या संसाराला हातभार लागावा आणि घरी बसून आजारी पडण्यापेक्षा कामात राहावं, या विचारातून मंगला आवळे या आजी रिक्षा चालवतात. त्यांच्या या आत्मनिर्भरतेमुळे प्रवासीच नव्हे, तर संपूर्ण परिसर त्यांचं कौतुक करत आहे. गर्दीच्या रस्त्यावरूनही त्या निर्धास्तपणे रिक्षा चालवतात. त्यांच्या आत्मविश्वासासमोर वय लहान ठरलं आहे. खरं तर, मंगला आवळेंचं आयुष्य संघर्षमय राहिलं. पतींचं निधन मुलं लहान असतानाच झालं. त्यानंतर त्यांनी मोलमजुरी करून तीन मुली आणि एका मुलाचा संसार उभा केला. आज मुलगा एसटीमध्ये चालक म्हणून काम करतो, मुलींची लग्नं झाली आहेत. मात्र, स्वतःच्या औषधोपचाराचा खर्च आणि मुलाच्या संसाराला हातभार लागावा म्हणून मंगला आवळे यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.

काय म्हणाल्या मंगला आवळे?

मी घरी बसून होते, पण मी रिक्षा चालवायला शिकले आहे. घरी बसून काय फायदा होणार? म्हणून मी रिक्षा शिकले. मुलाने मला रिक्षा चालवायला शिकवली. रिक्षा शिकली ते चांगलंच झालं. अनेकांनी असं धाडस केलं पाहिजे. आत्ताची मुलं आई वडिलांना दमवतात कारण त्यांना इंग्रजी माध्यमांत घालावं लागतात. त्यांचा खर्च खूप असतो, त्यामुळे मुलाच्या संसाराला मदत व्हावी म्हणून मी रिक्षा चालवते. आई वडिलांनी मुलाला आणि मुलांनी आई वडिलांना पाठिंबा दिला पाहिजे. माझं वय झालं आहे, माझा मुलगा एसटी ड्रायव्हर आहे. त्याच्या संसाराला मदत म्हणून मी रिक्षा चालवते मला बरं वाटतं. मला रिक्षाची अजिबात भीती वाटत नाही. माझ्या बाजूने जे गाडी चालवतात ते पण मला समजून घेतात. आजीला जाऊ द्या म्हणत समजून घेतात.