शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले होते. दरम्यान, या ठिकाणी भाषण करताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानाने आता आणखी एक नवा वाद उफाळण्याचे चिन्हं दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य समोर आलं आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांकडून लोढांवर टीका करण्यात आली आहे. या पार्श्वबूमीवर मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारपरिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – शिवप्रतापदिनी प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंगलप्रभात लोढांनी अखेर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

“अजित पवार मोठे नेते आहेत, ते बोलू शकतात पण माझी त्यांना विनंती आहे, की शिवप्रतापदिनी प्रतापगडावर मी नेमकं काय म्हटलं आहे हे त्यांनी एकदा बघावं. मी तुलना केली नाही आणि करणारही नाही. मी नेमकं काय म्हटलं आहे हे बघितल्यानंतरच जे काही म्हणायचं आहे ते त्यांनी म्हटलं पाहिजे. त्यांना अधिकार आहे ते विरोधीपक्ष नेते आहेत ते बोलू शकतात, पण माझ्याकडून काही चूक झाली नाही असं मी प्रामाणिकपणे सांगतो.” असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले? –

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत खडेबोल सुनावले आहेत. “वाचाळविरांना आवरा हे सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चूका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जवाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसं वागलं आणि बोललं पाहिजे, याचं भान असायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचे तारतम्य या लोकांना राहिलं नाही आहे,” अशा शब्दांत अजित पवार यांनी लोढा यांच्यावर टीका केली.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंच्या बंडाची आग्र्यातून शिवरायांच्या सुटकेशी तुलना करणाऱ्या लोढांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मंगलप्रभात लोढांनी नेमकं काय म्हटलं होतं? –

“छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून ( महाविकास आघाडी ) बाहेर पडले,” असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangalprabhat lodha replied to opposition leader ajit pawars criticism msr
First published on: 30-11-2022 at 20:44 IST