Manikrao Kokate : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. एवढंच नाही तर निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार आणि शरद पवार यांनी एकमेकांवर टीकाही केली होती. त्यामुळे चांगलंच राजकारण तापलं होतं. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आज (१६ जानेवारी) पहिल्यांदाच पवार कुटूंब एका व्यासपीठावर आल्याचं दिसून आलं. बारामतीत कृषीक कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांच्या कामाचं कौतुक करत पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला. तसेच आपल्याला कृषी मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा नव्हती, असं म्हणत ‘अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही कळत नाही’, असं म्हटलं. तसेच पहाटेचा शपथविधी वेळी देखील आपण अजित पवारांबरोबर होतो, असंही कोकाटे यांनी म्हटलं.

माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले?

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला जी जबाबदारी दिली, खरं तर मला अपेक्षा नव्हती की अजित पवार मला कृषी खातं देतील. मी अजित पवारांकडे कोणतंही खातं मागितलं नव्हतं. तसेच कोणतंही मंत्रिपद मागितलं नव्हतं. मात्र, अजित पवारांना जे कळतं ते कोणालाचं कळत नाही, असं आता मला वाटायला लागलंय. कारण अजित पवार हे हुशार व्यक्तिमत्व आहे. बारामतीत असताना येथील रस्ते पाहून सिंगापूरमध्ये आल्यासारखं वाटतं”, असं म्हणत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचं कौतुक केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पहाटेचा शपथविधी आठवा, मी तुमच्या पाठिमागे…’

कोकाटे पुढे म्हणाले की,”सकाळी उठून कामाला लागण्याचा पहिला दिवस मी माझ्या आयुष्यात आज पाहत आहे. कारण अजित पवारांना माहिती आहे की मी उशीरा उठतो. त्यामुळे त्यांनी मला काल सांगितलं की उद्याच्या दिवस तसदी घ्यावी लागेल. तेव्हा मी अजित पवारांना म्हटलं की जेव्हा गरज असते तेव्हा खांद्याला खांदा लावून मी कुठेही उपस्थित असतो. नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा, मी तुमच्या पाठिमागेच उभा होतो”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला.