सोलापूर : घरफोडी किंवा चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत निम्मीच दर्शवायची आणि सुदैवाने गुन्हा उघडकीस आल्यानंतर जप्त केलेल्या त्याच सोन्याच्या दागिन्यांची किंमत दुप्पट म्हणजे चालू बाजारभावाप्रमाणे दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेण्याची सोलापुरात पोलिसांची कार्यपध्दती पुन्हा दिसून आली आहे. पोलिसांचा हा अप्रामाणिकपणा की हातचलाखी म्हणायची, असा प्रश्न जाणकार नागरिक उपस्थित करीत आहेत.

त्याचे असे झाले की, गेल्या २९ आॕक्टोंबर रोजी शहरात विजापूर रस्त्यावरील मंत्रिचंडक पार्कमध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक हुसेनबाशा चाँदसाहेब शेख यांची भरदिवसा घरफोडी होऊन त्यात चोरट्यांनी १२ लाख रूपयांच्या रोकडसह १९ तोळे ३ ग्रॕम सोन्याचे दागिने व ३२ तोळे चांदीचे दागिने लांबविले होते. या घरफोडीची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल करून घेताना पोलिसांनी जुन्या वापरत्या  सोन्याच्या दागिन्यांची किंमत ३० हजार रूपये एवढी दर्शविली होती. त्यानुसार घरफोडीत लंपास झालेल्या १९.३ तोळे सोन्याचे मूल्य प्रतितोळा ३० हजार रूपयांप्रमाणे एकूण पाच लाख ७९ हजार रूपये इतके दर्शविले गेले होते.

सुदैवाने शहर गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा छडा लावून अशपाक सैफनसाहेब जाटगर (वय ३०, रा. सुभाषनगर,मिरज, जि. सांगली, मूळ रा. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) या संशयित गुन्हेगाराला पकडले. त्याच्याकडून हुसेनबाशा शेख यांच्या घरफोडीसह विजापूर रस्त्यावरील नवीन आरटीओ कार्यालयाजवळील अन्य एक घरफोडीही उजेडात आली. शेख यांच्या घरफोडीत लंपास झालेल्या १२ लाख रोख रकमेपैकी पोलिसांना पाच लाख १० हजारांची रोकड हस्तगत करता आली. उर्वरीत सहा लाख ९० हजारांची रोकड हस्तगत होणे बाकी आहे. दुसरीकडे दोन्ही घरफोड्यांतील हस्तगत झालेले सोन्याचे दागिने २२ तोळे ३ ग्रॕम एवढे आहेत. त्यांची किंमत पोलिसांनी अकरा लाख १५ हजार रूपये एवढी दाखविली आहे.