मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जेसीबीने फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यावरून होत असलेल्या टीकेवर बोलताना जरांगेंनी भुजबलांचा एकेरी उल्लेख करत टीका केली. तसेच फुलं, जेसीबी पाहणाऱ्यांनी मराठा समाजातील ३२ लाख लोकांना मिळालेलं आरक्षणही पहावं, असंही म्हटलं.
मनोज जरांगे म्हणाले, “जेसीबीने फुलं टाकून स्वागत करणं हे शक्तीप्रदर्शन नाही. आम्ही एकमेकांशी संवाद साधत आहोत. आम्ही आमच्या समाजातील लेकरांना न्याय मिळावा म्हणून एकत्र येत आहोत. त्याला यात जेसीबी आणि फुलच दिसत आहेत. त्याने आरक्षणही पहावं. त्याचे काय डोळे गेले आहेत का? त्याने आरक्षण द्यायचंही बघावं, तिकडेही लक्ष द्यावं.”
“स्वतः आरक्षण खातो आणि आमचंही आरक्षण बुडाखाली…”
“३२ लाख लोकांना आरक्षण मिळालं. आयुष्याची भाकरी मिळाली म्हणून आनंदात ते जेसीबी, फुलं आणत आहेत. त्याला केवळ जेसीबी दिसत आहेत, ७० वर्षांपासून आरक्षण नाही तेही दिसू दे. तो स्वतः आरक्षण खातो आणि आमचंही आरक्षण बुडाखाली घेऊन बसला आहे. त्याचे काय डोळे गेले आहेत का? हे पोरं त्रास-वेदना सहन करत आहेत. त्याने तेही बघावं,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “चिथावणीखोर भाषण करू नका”; अजित पवारांच्या सल्ल्यावर मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले…
“पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, सरकारने तातडीने निधी द्यावा”
अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवर मनोज जरांगे म्हणाले, “पावसाने शेतकऱ्यांचं नुकसानही झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारला विनंती आहे की, त्यांना उघड्यावर पडू देऊ नका. राज्य आणि देश जगवणारा शेतकरी वर्ग आहे. त्यांच्या फार हालअपेष्टा होत आहेत. त्यांना तातडीने निधी द्या. पंचनामेही करा. काही ठिकाणी पंचनामेही सुरू नाहीत. बऱ्याच अधिकाऱ्यांना पंचनामे करायला वेळच नाही वाटतं.”