Manoj Jarange reaction : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईच्या आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू होते. दरम्यान राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यास मंजूरी दिली असून त्यासंबंधीचा जीआर देखील काढण्यात आला आहे. यानंतर आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर उपोषण सोडले आहे. पाच दिवसांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाच्या आंदोलनाला मिळालेले हे यश गेल्या ७५ वर्षातील सर्वात मोठा विजय असल्याची भावना मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

उपोषण सोडल्यानंतर टीव्ही९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “माझ्या जातीचं कल्याण झालं बस… मला त्याचाच आनंद आहे. पश्चिम महाराष्ट्रतील मराठ्यांचं कल्याण झालं आणि मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांचं कल्याण झालं. माझी लेकरं आता सुखी राहतील.

“मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी खूप मोठा सूवर्ण दिवस आहे. तसं पाहिलं तर सगळ्याच महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण आहे. कारण विदर्भात देखील आपण याआगोदर नोंदी दिल्या आहेत, खानदेशात आणि कोकणात देखील दिल्या आहेत. शिंदे समिती ही महाराष्ट्रासाठी आहे. आज तीन कामं झाली- पश्चिम महाराष्ट्राचं कल्याण झालं, मराठवाड्याचं कल्याण झालं आणि शिंदे समिती ही महाराष्ट्रात काम सुरू ठेवणार आहे, म्हणजे महाराष्ट्राचं कल्याण झालं. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आज सोन्याचा दिवस आहे,” असेही मनोज जरांगेंनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, “माझ्या समाजाला खाली मान घालून चालायची गरज नाही. मुंबईपण काबीज करून दाखवली. मुंबईत पाय पण ठेवून दाखवला आणि विजयदेखील घेऊन दाखवला. संपूर्ण महाराष्ट्र आज आनंदी आहे. असा विजय ७५ वर्षात कधी झाला नव्हता तो मराठ्यांचा झाला,” असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.