Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक मुंबईत आल्यानंतर महायुती सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवीन शासन आदेश काढला होता. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाकडून मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याचा पुरेपूर प्रयत्न होताना दिसत आहे. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची पावले कशी उचलली गेली, याचा प्रचार भाजप समर्थकांकडून केला जात होता. कालच राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीला वंदन करतानाचा फोटो असलेल्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे शिल्पकार असल्याची बाब अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला. याबाबत आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपच्या जाहिरातबाजीवर रोहित पवारांची टीका
अनंत चतुर्दशीच्या दिवशी ‘देवाभाऊ’ अशा मथळ्याखाली राज्यातील सर्वच प्रमुख दैनिकांमध्ये मोठमोठ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. पहिल्या आणि दुसऱ्या पानावर या जाहिराती झळकल्या होत्या. या जाहिरातींमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मोठा होता. राजकीय वर्तुळात या जाहिरातीची प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, ही जाहिरात नेमकी कोणाकडून देण्यात आली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. याबाबत आमदार रोहित पवार यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणाचे शिल्पकार म्हणून ब्रँडिंग करणारी ही जाहिरात भाजप नव्हे तर मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने दिली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर या जाहिराती दिल्या, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
कुणी बॅनर लावा किंवा काहीही करा, आम्ही तुमचे आभारच मानतो आहोत की. कौतुकही करतो आहोत. मात्र आता तातडीने प्रमाणपत्र द्या अशी आमची मागणी आहे. सरकारनं कामं केली तर आम्ही कौतुकच करु. शिंदे समितीला बढती देऊन सगळ्या विभागात नोंदी शोधण्याचं काम सुरु ठेवा. आमच्या मागण्या पूर्ण करा असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. गरीब मराठ्यांनी लढाई जिंकली आहे त्यामुळे गरीब मराठ्यांनी कुणाचंच ऐकायचं नाही. एखाद्या शब्दामुळे प्रमाणपत्र द्यायला, काही प्रश्न आलाच तो शब्द आपण सुधारुन घेऊ. गरीब मराठ्यांनी कोण काय बरळतं आहे त्याकडे लक्ष देऊ नका. मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही हा माझा शब्द आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.