Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू असून आज (३१ ऑगस्ट) आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत. आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनात भर पावसात अज्ञात व्यक्तीने हजारो रेनकोट मराठा आंदोलकांसाठी वाटल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रेनकोट वाटणाऱ्या व्यक्तीचे आंदोलकांकडून आभार मानल्याच्याही पोस्ट व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर यासंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत आंदोलनाच्या नावाने पैसे गोळा करण्यात येत असल्याचा आरोप करत पैसे खाणाऱ्या सहकाऱ्यावर मनोज जरांगे हे चांगलेच संतापले आहेत. तसेच अशा प्रकारे रेनकोटच्या नावाखाली किंवा अन्नछत्राच्या नावाखाली कोणीही पैसे मागत असेल तर पैसे न देण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केलं आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
“आंदोलनाच्या ठिकाणी जे अन्नछत्र सुरु केले आहेत ते महाराष्ट्रातील लोकांनी आणि काही मुंबईतील लोकांनी केले आहेत. हे आंदोलकांनी समजून घ्या. अन्नछत्र जे सुरू केले आहेत ते एकएका व्यक्तीने सुरू केलेले आहेत. पण त्याच्या नावाखाली कोणीही पैसे कमवू नका. अन्यथा मी मीडियात त्या व्यक्तीचं नाव घेईन. परत म्हणू नका हे काय झालं. अन्नछत्र एकाने सुरू केलंय आणि पैसे दुसरा गोळा करतोय. अशा पद्धतीने गरीबांचं रक्त पिण्याचं काम बंद करा. मी स्पष्ट सांगतो त्या व्यक्तीचं नाव घेईन, तो माझ्या कितीही जवळचा असला तरीही मी त्याचं नाव घेईन”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
“तुम्ही माझ्यासाठी गाडी घेऊन पळता म्हणून तुम्ही पैसे जमा करू शकत नाहीत. तुझ्या गाडीचे आतापर्यंत किती पैसे झाले ते आम्ही सर्व मराठा वर्गणी करून देतो. मी कोणाला बोलतो हे त्या व्यक्तीला कळत असेल. कारण त्या व्यक्तीने लोकसभेत देखील पैसे खाल्ले हे मलाही माहिती आहे. आताही रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करत असेल तर मला हे जमणार नाही. रेनकोट एका व्यक्तीने वाटलेत. मला या ठिकाणी रेनकोट वाटप करायचे असं म्हणून लोकांकडून पैसे जमा केले जात आहेत. मात्र, असे भिकार धंदे बंद कर. तुझी माझ्या नजरेत प्रतिष्ठा आहे. मी स्पष्ट सांगतोय अन्यथा मी पुराव्यासह नाव जाहीर करेन”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
“लोकसभेला तू कोणाकडून पैसे घेतले याचंही नाव घेईन आणि रेनकोटचे कोणाकडून पैसे घेतले याचंही नाव घेईन. आतापर्यंत मी सोडून दिलं होतं. तू माझ्या जवळचा असेल किंवा लांबचा, मला काहीही देणं घेणं नाही. कधीही विश्वासघात होऊन द्यायचा नसतो. मी जसं जातीसाठी पळतो. आता तुझ्या गाडीचं किती रुपयांचं डिझेल झालं ते सांग, महाराष्ट्रातील मराठ्यांना सांगतो ते एका मिनिटात देतील. मी समाजाला सांगतो एक रुपयाही कोणला द्यायचा नाही आणि दिले असतील तर तुमचे पैसे परत घ्या. आम्हाला रेनकोट किंवा छत्र्यांची गरज नाही. आम्ही पावसात बसू”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.