Manoj Jarange Patil Lift Fall Down: मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील हे लिफ्ट अपघातामधून बचावले आहेत. बीडमधील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये एका सहकाऱ्याला भेटायला गेले असताना त्यांची लिफ्ट पहिल्या मजल्यावरून कोसळली. तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी लिफ्टमध्ये गेले. पण क्षमतेपेक्षा अधिक लोक लिफ्टमध्ये शिरल्याने लिफ्ट ओव्हरलोड होऊन लिफ्ट पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली.

या घटनेने रुग्णालय परिसरात खळबळ उडाली. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यासह कुणालाही या अपघातात दुखापत झालेली नाही. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही आता समोर आला आहे.

दरम्यान सीसीटीव्हीमध्ये मनोज जरांगे पाटील काही कार्यकर्त्यांसह लिफ्टमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. सदर लिफ्ट रुग्णांसाठी असल्याचे कळते. लिफ्ट सुरू झाल्यानंतर काही वेळातच ती कोसळते. मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर काही वेळातच रुग्णालयाचे कर्मचारी लिफ्टचा दरवाजा बाजूला करून सर्वांना बाहेर काढतात.

रुग्णालयाचे कर्मचारी महारुद्र बडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेकजण आले होते. त्यानंतर जरांगे पाटील लिफ्टमध्ये शिरल्यानंतर त्यांच्यामागोमाग सगळेच आत शिरले. आम्ही त्यांना सांगतो होतो काही लोकांनी पायऱ्यांचा वापर करावा. पण ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली. पण यात कुणालाही इजा किंवा दुखापत झाली नाही.

मराठा आरक्षणासाठी आरपारचा लढा

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी जरांगे मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी त्यांचे शिष्टमंडळ आझाद मैदानासह इतर मैदानाची पाहणी करत आहे. दरम्यान शिष्टमंडळ काही दिवसांपूर्वी मुंबईकडे रवाना होण्याआधी जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईतून माघारी फिरणार नाही, असा इशारा जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना दिला होता.

महादेव मुंडे हत्याप्रकरणातही जरांगे पाटील यांचा पाठपुरावा

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातही लक्ष घातले आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय मोर्चाचे नेतृत्व त्यांनी नुकतेच केले आहे. मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

आठ दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास बीड जिल्हा बंद करण्यात येईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मेळाव्यातून दिला. या मेळाव्यात मराठा समाज मोठ्या भावाच्या भूमिकेतून महादेव मुंडे कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात आले.