Manoj Jarange Patil Mumbai Azad Maidan Protest : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट (शुक्रवार) रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यांनी राज्य सरकारला तसा इशारा दिला होता. मात्र, त्यांच्या आंदोलनाला पोलिसांकडून व न्यायालयाकडून परवानगी मिळाली नव्हती. ‘तरीदेखील आम्ही मुंबईत धडक देऊ’ असा इशारा जरांगे व त्यांच्या समर्थकांनी दिलेला असतानाच आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्यांना केवळ एकच दिवस आंदोलन करता येईल. कारण पोलिसांनी त्यांना केवळ एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. यासह पोलिसांनी जरांगे यांच्यासमोर इतरही काही अटी व शर्ती ठेवल्या आहेत.

पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी येताना केवळ पाच वाहनं आणण्याची व केवळ पाच हजार समर्थकांसह आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. तसेच केवळ एकच दिवस आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक या तीन अटी मान्य करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

दरम्यान, आंदोलनाला परवानगी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की “मी लोकशाहीच्या व कायद्याच्या सर्व नियमांचं पालन करेन. माझ्याबरोबर येणारा माझा समाज देखील सर्व नियम पाळेल. आम्ही काही हट्टी नाही. प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचं तंतोतंत पालन केलं जाईल. परंतु, आम्ही केवळ एक दिवस आंदोलन करणार नाही. आम्हाला बेमुदत आंदोलन करायचं आहे. आम्ही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करत राहणार असा निर्धार केला आहे. उर्वरित सगळे नियम मी पाळेन.”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आंदोलनाला मिळालेल्या परवानगीबाबत मी आत्ता फार काही बोलणार नाही. कारण पोलिसांनी परवानगी देताना नेमक्या काय अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत त्याबाबत मला माहिती नाही. मी पोलिसांचा आदेश वाचतो आणि त्यानंतरच यावर प्रतिक्रिया देतो. मात्र, आंदोलनाला मिळालेल्या परवानगीसाठी मी सरकार आणि न्यायालयाचे आभार मानतो.”