Manoj Jarange on Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखले जातात. आरक्षणच्या मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका अनेकदा मांडली आहे. लोकांच्या संख्येच्या राजकारणाला बळी न पडता ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचे याआधीही दिसून आले आहे. मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक आले आहेत. हे आंदोलक आता पुन्हा का आले? असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारला जावा, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. या प्रतिक्रियेवर मनोज जरांगे पाटील यांनी आता टीका केली आहे.
आज सकाळी आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेबद्दल विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, “दोघे ठाकरे भाऊ चांगले आहेत, त्यांचा ठाकरे ब्रँड चांगला आहे, असे समाजाचे म्हणणे आहे. पण राज ठाकरे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतात. त्यांना आम्ही कधीही विचारलेले नाही.”
फडणवीसांनी लोकसभेला तुमचा गेम केला
तुमचे १३ आमदार निवडून दिले होते. ते पळून गेले. तरी तुम्ही मराठवाड्यात का आलात? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. “तुम्ही ५० वेळा नाशिकला का येतात? हे विचारले का? लोकसभेला फडणवीसांनी तुमचा गेम केला. त्यानंतर विधानसभेला तुमचा मुलगा पाडला. तरी तुम्ही त्यांचीच तळी उचलता. फडणवीस तुमच्या घरी चहा पिऊन गेले तर तुमचा पक्ष बरबाद झाला तरी चालतो”, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
तसेच राज ठाकरे कुचक्या कानाचे असल्याचीही टीकाही जरांगे यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका
राजकीय आरक्षणासाठी सर्व धडपड सुरू आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा उल्लेख करताना केली. याचाही समाचार मनोज जरांगे पाटील यांनी घेतला. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या शिव्या खाऊ नयेत. चंद्रकात पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आमच्या दाखल्याच्या पडताळणी रोखून धरल्या होत्या. त्यामुळे इथून पुढे त्यांनी जास्त बडबड करू नये.
आमची मागणी कायद्याला जोडूनच
मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. मंडल आयोगाने ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिले होते. ते ३० टक्क्यांवर कसे गेले? संविधानाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत घातली आहे. मग सध्या ५२ टक्के आरक्षण का आहे? आमची मागणी कायद्याबाहेर असे म्हणता? मग तुम्ही ज्या जाती-पोटजाती आरक्षण घातल्या, ते बेकायदेशीर नाही का? असे अनेक प्रश्न मनोज जरांगे यांनी यावेळी उपस्थित केले.