मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानातल्या दसरा मेळाव्यात भाषण करत असताना मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तसंच ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. यापुढे मराठा समाजाचं आंदोलन झालं तर ते शांततेत होईल पण ते सरकारला पेलवणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले होते. आता आज ते काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आंदोलनावर आपण ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाविषयी काय म्हणाले जरांगे पाटील?

मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचं आश्वासन केलं. मी कार्यक्रमात असल्याने पाहिलं नाही. आमचा दिवसरात्र कार्यक्रम सुरु आहे. मला बघायला वेळ मिळाला नाही. पण त्यांनी छत्रपतींची शपथ घेतली असेल तर ही समाजाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण हवं आहे.

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान ठेवला

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मान ठेवला. आम्ही ४० दिवस दिले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देवून आमचा सन्मान करावा. कारण ते शब्दाला पक्के आहेत, अशी मराठा समाजात भावना झाली आहे. त्यांनी त्या शब्दाला जागावं. त्यांनी आता आरक्षण द्यावं. आम्ही मराठे आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलन थांबवण्याचा प्रश्नच येत नाही

आंदोलन थांबवण्याचा काहीच प्रश्नच नाही. त्यांनी आमच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला. आम्ही मोठं मन दाखवून ४० दिवसांचा वेळ दिला. आम्ही १० दिवस जास्त दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे. पण आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी गावात उपोषण सुरु केलं होतं. या आंदोलनावर लाठीचार्ज झाला आणि मराठा आंदोलनाचा संघर्ष सगळ्या महाराष्ट्रासमोर आला. त्यानंतर काही संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवलं नव्हतं. मात्र एक महिन्याची मुदत सरकारने मागितली होती ज्यानंतर चाळीस दिवसांची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेऊन आंदोलन सुरुच ठेवलं होतं. आता आज ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.