मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या १३ जुलैपर्यंत निकाली काढण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला इशारा दिला आहे की, १३ जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आगामी विधानसभा निवडणुकीत तुमच्या उमेदवारांना परिणाम भोगावे लागतील. मनोज जरांगे पाटील म्हणाले, येत्या १३ जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या तर ठीक अन्यथा मला माझ्या पद्धतीने गोष्टी हाताळाव्या लागतील.

मनोज जरांगे म्हणाले, मला राजकारणात यायचं नाही. मला माझ्या समाजाचं राजकारण करायचं नाही. त्याचबरोबर माझ्या समाजातील लोकांनाही राजकारण करायचं नाही. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून देणे हा आमचा एकमेव उद्देश आहे. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या अंगावर मला वर्दी (शासकीय गणवेश) पाहायची आहे. आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना सरकारी नोकरी मिळवून द्यायची आहे. एवढंच आमचं स्वप्न आहे. राजकारण करणं हे आमचं स्वप्न नाही. त्यामुळे तुम्ही येत्या १३ जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा मला माझ्या पद्धतीने गोष्टी कराव्या लागतील. मी राजकारणात उतरलो तर आमचा दणका कसा असतो ते तुम्ही बघितलंच असेल. लोकसभा निवडणुकीत आम्ही एक दणका दिला आहे आता विधानसभा निवडणुकीला आणखी मोठा दणका देऊ.

मराठा आंदोलक म्हणाले, मी एखाद्या उमेदवाराला पाडा म्हणायला (समाजातील कार्यकर्त्यांना आदेश द्यायला) मागे हटणार नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर इतक्या उमेदवारांना पाडायला सांगेन की तुमचे २८८ उमेदवार निवडून येऊ देणार नाही. मला राजकारणात जायचं नाही. मला केवळ माझ्या जातीला न्याय द्यायचा आहे. आमच्या समाजातील लोकांनाही राजकारण करायचं नाही. त्यामुळे मी येत्या १३ जुलैपर्यंत थांबेन. मी आज कोणालाही, कोणताही शब्द देणार नाही. कारण मी कधी कोणाला धोका देत नाही. मी १३ जुलैपर्यंत थांबेन. परंतु, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मला वेगळा पर्याय निवडावा लागेल. आम्ही ठरवलं तर दिलेल्या शब्द मागे फिरवत नाही, मागे हटणार नाही.

हे ही वाचा >> निवृत्ती कधी घ्यावी? विराट कोहली-रोहित शर्माबद्दल बोलताना शरद पवारांनी सांगितलं ‘टायमिंग’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्हाला केवळ पाहायचं आहे की येत्या १३ तारखेपर्यंत सरकार काय करतंय. मराठ्यांना न्याय देतं की देत नाही. मला माझ्या समाजाचं राजकारण करायचं नाही. पण आरक्षण दिलं नाही तर मी आमच्या लोकांशी बोलेन. त्यांच्या उमेदवारांना पाडायचं की निवडून आणायचं हे येत्या १३ तारखेला ठरवू. माझ्या एका ‘पाडा’ या शब्दावर त्यांची किती मोठी फजिती झाली आहे हे सर्वांनी लोकसभेला पाहिलं आहे. यावेळी तर मी उमेदवारांची नावं घेऊन त्यांना पाडा असं सांगणार आहे. मग त्या उमेदवारांची मतं मोजण्याला काही अर्थ नसेल.