राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका केली होती. “मराठा आरक्षणाचं आंदोलन आता भरकटलं आहे”, असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं होतं. विखे पाटलांच्या या वक्तव्यावर मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “मराठा समाजातील नेत्यांनी मराठ्यांवर आणि आंदोलकांवर आरोप करणं बंद करावं”, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे. “तुम्ही असेच टीका करत राहिलात तर तुमच्यामुळे एक दिवस जात मरेल”, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते, “मराठा आरक्षणाचं आंदोलन आता भरकटत चाललं आहे. या आंदोलनाचं गांभीर्य आता कमी झालं आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे असं काही नाही. आम्ही देखील मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. मी मागेही एकदा म्हटलं होतं आणि आता पुन्हा एकदा म्हणेन की मनोज जरांगे म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही. मराठा समाजासाठी काम करणारे लोक खूप आहेत. आम्ही देखील रस्त्यावर उतरून मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत.”

विखे पाटील यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील विखे पाटलांना उद्देशून म्हणाले, “मराठा समाजावर ही कसली वेळ आली आहे? तुमच्या आसपासचे सगळे ओबीसी नेते मराठ्यांच्या विरोधात एकवटले आहेत. तुमच्या अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी आमदार, माजी आमदार इथे येऊन बोंबलू लागले आहेत. ते भरकटले आहेत असं तुम्ही म्हणणार नाही. कारण तुम्हाला ते दिसणार नाही. मला असं वाटतं की मराठ्यांच्या नेत्यांनी आता मराठ्यांवर आरोप करणं बंद करावं. नाहीतर तुमच्यामुळे एक दिवस जात मरेल. जरा वेळेवर शहाणे व्हा. अजूनही हातून वेळ गेलेली नाही आणि मी देखील मागे हटणार नाही. तुम्ही माझी साथ दिली तरी, अथवा साथ दिली नाही तरी देखील मी मागे हटणार नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच.”

हे ही वाचा >> VIDEO : पंतप्रधान मोदी खासदारकीची शपथ घेताना राहुल गांधींनी का दाखवलं संविधान? अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील त्यांची मागणी लावून धरत म्हणाले, “आरक्षण मिळाल्यानंतर गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी होतील, अधिकारी होतील. ही भीती सगळ्यांनाच वाटते आहे. त्यामुळे मी मराठा आरक्षणाच्या बाजूने उभं राहू नये म्हणून मला घेरलं जातंय. सत्ताधारी पक्षातील नेते माझ्या बाजूने बोलत नाहीत. मात्र मराठा समाजाने माझ्या बाजूने रहावं, आपली एकजूट ठेवावी ही माझी विनंती आहे.”