Manoj Jarange Patil Warning to Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी मैदान परिसर रिक्त करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. या नोटिशीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे की “आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय इथून परत जाणार नाही.” त्याचबरोबर, “तुम्ही आम्हाला इथून उचलून तुरुंगात टाकलंत तरी आम्ही आमचं बेमुदत उपोषण चालू ठेवू. परंतु, आरक्षण घेतल्यानंतरच परत जावू”, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही मराठ्यांवर अन्याय करू नका. आम्ही काही मुंबई सोडणार नाही. तुम्ही फार फार तर काय कराल. १०० पोलीस पाठवून आम्हाला तुरुंगात डांबाल. एक लाख पोलीस पाठवले तरी आम्हाला तुरुंगातच न्याल. परंतु, आम्ही तुरुंगातून आंदोलन करू. तिथे उपोषणाला बसू. मात्र, मागे हटणार नाही.
जरांगे म्हणाले, “एका समाजावर अन्याय होईल असं वागू नका. आम्हाला इथून हुसकावून लावू नका. तसं केल्यास तुमचं हे कृत्य आमच्या जिव्हारी लागेल. आमच्या काळजावरील तुमचा हा वार तुम्हाला महागात पडेल.”
“आम्ही मुंबईत आलोय म्हणून पोलिसांकरवी आम्हाला मारहाण कराल, पण तुमच्या लोकांना…”
“पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावाल, तर ते तुमच्यासाठी घातक ठरेल. तुम्ही आमच्या पोरांवर लाठीहल्ला केला तर ते अतिघातक ठरेल. अशाने तुमच्या राजकीय चारित्र्यावर मोठा डाग पडेल. हे करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा. तुमच्याही लोकांना महाराष्ट्रात यायचं आहे, फिरायचं आहे. आम्ही मुंबईत आलो आहोत म्हणून आम्हाला पोलिसांकरवी मारहाण कराल. पण तुमच्या लोकांना महाराष्ट्रात फिरायचं आहे हे लक्षात ठेवा. आम्ही अद्याप शांत आहोत त्यामुळे शांततेत कसा मार्ग काढता येईल ते पाहा.”
“आम्हाला इथून हाकलून लावण्याच्या वल्गना करू नका”, जरांगेंचा फडणवीसांना इशारा
मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले, “गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांचा पोलिसांकरवी अपमान करू नका. फडणवीसजी तुम्ही त्यांचा सन्मान केला तर ते तुम्हाला कधी विसरणार नाहीत. परंतु, तुम्ही त्यांचा अपमान केलात तर त्या अपमानाचा बदला घेण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण होईल. त्यांच्या मनात तुमच्याविरोधात चीड निर्माण होईल. त्यामुळे गोडीगुलाबीने जे जे करता येईल ते करा, आरक्षणप्रश्नावर मार्ग काढा. तुमच्यापेक्षा आमची संख्या जास्त आहे हे ध्यानात ठेवा. तुम्ही ज्यांच्या जीवावर बोलत असता त्यांच्यापेक्षा आमची संख्या साडेनऊपट अधिक आहे. त्यामुळे नको तिथे घुसू नका. उगाच आझाद मैदानात हाकलून देऊ अशा वल्गना करू नका. लोकांना कसा न्याय देता येईल ते पाहा.”