मृत्यूच्या सावलीतील पाच मुली आणि आजीच्या जीवनसंघर्षांची हृदयद्रावक सत्यकथा ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर मदतीचे अनेक हात पुढे आले आहेत. राज्यातील अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्थांसह सहृदयी व्यक्तींनी या मुलींचे आयुष्य उभे करण्यासाठी पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.

मुलगाच हवा, या हव्यासापोटी अविचारी बापाने आईचा खून केला आणि जन्मठेप भोगायला तुरुंगात गेला. त्यामुळे आई-वडिलांना पोरक्या झालेल्या पाच मुलींचा सांभाळ कसा करायचा, या विवंचनेतून पुढे आजोबानेही आत्महत्या केली. त्यामुळे या पाच निष्पाप मुली खरोखर अकाली पोरकेपण म्हणजे काय, याचा नित्य अनुभव घेत आहेत. सोलापूर जिल्ह्य़ाच्या मंगळवेढा तालुक्यातील बोराळे या छोटय़ाशा गावातील या पाच मुली सध्या जणू मृत्यूच्या सावलीत वावरत असून, त्यांची वृद्ध आजी जनाबाई वाघमारे हिचा दररोजचा जीवनसंघर्ष सुरू आहे. हे हृदयद्रावक वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध करताना ‘मुलगी वाचवा, मुलीला शिकवा’ या घोषणा आणि मुलींसाठी ‘सुकन्या’पासून ते ‘माझी कन्या भाग्यश्री’पर्यंतच्या अनेक सरकारी योजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हे वृत्त प्रसिद्ध होताच राज्यभरातून अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी ‘लोकसत्ता’शी संपर्क साधत या पाचही मुलींना दत्तक घेण्याची तयारी दर्शविली. यात चित्रपट अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे ‘नाम फाऊंडेशन’, पुण्याचे जनसेवा फाऊंडेशन, नगरचे स्नेहालय, कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या शिरोळचे विद्यार्थी विकास प्रबोधिनी ट्रस्टचे बालोद्यान, नवी दिल्लीच्या एसओएस संचालित बालग्रामची लातूर शाखा, सोलापुरातील हबीबा शिक्षण प्रसारक मंडळ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय मुंबई व ठाण्यातील काही सहृदयी व्यक्तींनी या पाचही मुलींचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे, तर सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे, प्राणिमित्र विलास शहा, सिद्धेश्वर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष नरेंद्र गंभीरे व इतरांनी वैयक्तिक मदतीचा हात देऊ केला आहे.