​सावंतवाडी: माजी आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज एकवटला आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले आणि तीव्र आक्षेप नोंदवला.

​महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्या तक्रारीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी आपला खोटेपणा लपवण्यासाठी अशा प्रकारे खोट्या ॲट्रॉसिटीचा आधार घेतल्यास भविष्यात सिंधुदुर्गातील लोकशाही यंत्रणा कोलमडून पडेल, अशी भीती मराठा समाजाने व्यक्त केली आहे.

​यावेळी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी पोलिसांना थेट इशारा दिला आहे. नाईक यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी, अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करणे कुडाळ पोलिसांना बंधनकारक आहे. या निर्णयानुसार, सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करता येणार नाही.

​ॲड. सावंत यांनी स्पष्ट केले की, जर कुडाळ पोलिसांनी या नियमाचे पालन केले नाही आणि चुकीच्या पद्धतीने वैभव नाईक यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, तर कुडाळ पोलीस अधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची याचिका कोल्हापूर खंडपीठाकडे दाखल करण्यात येईल. चुकीच्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याविरुद्ध मराठा महासंघ कायम उभा राहील आणि कायद्याच्या तरतुदीचे योग्य पालन न झाल्यास भविष्यात उग्र आंदोलन करण्याचा इशाराही ॲड. सावंत यांनी दिला आहे.

​चुकीच्या पद्धतीने दाखल केलेल्या ॲट्रॉसिटी गुह्याविरोधात आक्षेप नोंदवण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांनी ओरोस येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. ​यावेळी सतीश सावंत, बाबा सावंत, श्रेया परब, सुशांत नाईक, अमरसेन सावंत, संतोष परब, अनुपसेन सावंत, विनय गायकवाड, शैलेश घोगळे, योगेश काळप, हर्षद पालव, आशिष काष्टे, चंदू कदम, बबन बोभाटे, कृष्णा धरी, सचिन कदम, राजू कविटकर, योगेश धुरी, शेखर गावडे, एकनाथ धुरी, समीर लब्दे, दीपक आंगणे, तेजस राणे, सिद्धेश राणे, रोहित राणे, रुपेश आमडोस्कर, अमीत राणे, पिंटू उभारे, प्रदीप गावडे, संदीप सावंत, बाळू पालव, पप्पू पालव, आदित्य सावंत, दीपेश परब, दीपक धुरी, रवी कदम, भगवान परब, यज्ञेश गॊडे, निलेश परब, रमेश राणे आदींसह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.