शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या सिंधुदुर्ग नगरीत अतिविराट मोर्चाने मराठय़ांनी शक्तिप्रदर्शन दाखवून दिले. या मूक मोर्चाने गर्दीचा उच्चांकही निर्माण केला. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना रणरागिणींनी निवेदन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास प्राची कोकीतकर, सानिया सावंत, तन्वी कदम, पूजा सावंत, यशिका परब यांनी पुष्पहार घातला. त्यानंतर मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील क्रीडांगणाच्या दिशेने पोहोचला.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात इतिहास घडविणाऱ्या या मूक मोर्चात आबालवृद्धांचा समावेश होता. तसेच मुस्लीम, ख्रिस्ती बांधवदेखील सहभागी झाले होते. मुस्लीम बांधवांनी पाण्याचे वाटपदेखील केले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात २० मुद्दे उपस्थित केले आहेत. कोपर्डी घटनेचा निषेध व आरोपींना फाशी, अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करावा, शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अमलात आणाव्यात. मराठा समाजाला मराठा जात म्हणून नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे.

शिवछत्रपतींचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तातडीने करावे, शेतीमालावरील सर्व प्रकारची निर्यात बंदी उठवावी, निर्यातीवरील कर तातडीने रद्द करावेत, शेतकऱ्यांसाठी उत्पन्नातील जोखमीचे व्यवस्थापन ‘ईर्या’ हा कायदा राज्य सरकारने आर्थिक तरतुदीसह करावा, मराठा तरुणांना स्वयंरोजगारासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्वरित कार्यान्वित करावे व त्यासाठी आर्थिक तरतूद करावी, राज्यात गेल्या चार वर्षांतील दुष्काळामुळे शेती पूरक कर्ज एनपीए करावीत. शेती व पूरक व्यावसायिक सर्व उत्पादनाला प्रत्यक्ष उत्पादन खर्चावर आधारित भाव देणारा कायदा करावा, सार्वजनिक उपक्रम, खासगी उद्योगासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी त्या भाडेपट्टय़ाने घ्याव्यात, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे आणि वारसांना शासकीय नोकरी द्यावी. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची भरपाई द्यावी, पूर्णवेळ शेतकऱ्यांच्या शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांची फी व जेवण, निवास खर्च शासनाने करावा, सिंधुदुर्गातील सिंचन प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करावेत. सिंधुदुर्गातील खासगी वने व वनसंस्था या सातबारावरील नोंदी रद्द कराव्यात, सिंधुदुर्गातील इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करावेत. गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुलभ धोरण, आकारीपड व कबुलायतदार गावकर जमीन वाटप करावी, देवस्थान इनाम (वर्ग ३) म्हणून सातबाराच्या नोंदी रद्द कराव्यात, सिंधुदुर्ग किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा व किल्ल्याची डागडुजी करावी, अशा मागण्या या मोर्चातील निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्ग नगरीत सकाळपासूनच सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांतून लोक येत होते. त्यात विद्यार्थी, स्त्रिया, डॉक्टर, शेतकरी, अभियंते अशा सर्व स्तरातील बांधवांचा समावेश होता. वयस्कर लोकांची उपस्थिती उत्स्फूर्त होती. मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक खोळंबा झाल्याने मोर्चाच्या ठिकाणी उशीराने लोक पोहोचले.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मराठा बांधवांसोबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आम. नितेश राणे, माजी आमदार शिवराम दळवी, राजन तेली, प्रमोद जठार, संदेश पारकर, प्रवीण भोसले, विकास सावंत, सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खोत सावंत भोसले, अभिनेत्री अश्विनी बडगे, विक्रांत सावंत तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा मूक क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अ‍ॅड. सुहास सावंत, नागेंद्र परब, डॉ. प्रवीण सावंत, जान्हवी सावंत, विक्रांत सावंत, प्रभाकर सावंत, धीरज परब, तसेच प्रत्येक तालुक्यातील समन्वयक उपस्थित होते.

फलक, भगवे झेंडे, छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असणाऱ्या झेंडय़ांनी वातावरण शिवमय करून सोडले होते. या मोर्चातील शिस्त, शांतता व स्वच्छताही दिसून आली. मात्र खड्डेमय रस्त्यामुळे मोर्चाला आलेले मराठा समाज बांधव वेळीच पोहोचू शकले नाहीत.

सकाळी साडेदहा वाजता मोर्चा सुरू झाला तो दुपारी १ वाजता राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. यावेळी कोपर्डीतील निर्भया, आत्महत्या करणारे शेतकरी, शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha kranti morcha in sindhudurg district
First published on: 24-10-2016 at 01:22 IST