अहिल्यानगर: मुंबईकडे जाताना सरकारने त्रास दिला, आरक्षण मिळाले नाहीतर काय करायचे हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आता मागे हटायचे नाही, अशा शब्दांत मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज, बुधवारी रात्री शेवगाव येथे बोलताना इशारा दिला.
मराठा आरक्षण मागणीसाठी जरांगे यांनी मोर्चासह मुंबईकडे कूच केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमार्गे त्यांचे रात्री उशिरा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे आगमन झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत वाहनांचा मोठा ताफा होता तसेच कार्यकर्त्यांनीही मार्गावर ठिकठिकाणी गर्दी केली होती. रात्री उशिरा ते नगर शहराच्या बाह्यवळण रस्त्याने आळेफाट्याकडे (पुणे) रवाना होणार होते. शेवगाव व नगर शहराजवळ त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. जरांगे यांचे दुपारी शेवगावमध्ये आगमन होणार होते. मात्र प्रत्यक्षात रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचे आगमन झाले.
वाहतूक कोंडी
दरम्यान या मोर्चामुळे शेंडी बाह्यवळण रस्ता ते कल्याण महामार्गापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली होती. शेवगाव ते नगरदरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने चहा, पाणी, नाश्त्याची सोय करण्यात आली होती. मोर्चा रवाना होण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जरांगे पाटील रात्री उशिरा आळेफाट्याहून शिवनेरीकडे जाऊन मुक्काम करणार आहेत. तिथून ते नंतर २९ ऑगस्टला मुंबईत प्रवेश करणार आहेत.