सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. या मुद्द्यावरून दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस केंद्रातील मोदी सरकारकडे बोट दाखवत आहे. तर राज्यातील भाजपाचे नेते याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा दावा करत आहेत. राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतानाच भाजपाचे राज्यसभेतील खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्यात दौरे करत असून, राजकीय नेत्यांच्या भेटीही घेत आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या या भूमिकेवर माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या राजकारणात ज्वलंत मुद्दा बनलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे सध्या महाराष्ट्राभर दौरे करत असून, मराठा समाजाचं म्हणणं ऐकून घेत आहेत. त्याचबरोबर विविध विधिज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांशीही संभाजीराजे यांनी आतापर्यंत भेटी घेतल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचं ते म्हणाले होते. संभाजीराजे यांच्या या भेटीवरून माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल, तर खुशाल जावं पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही,” असं म्हणत निलेश राणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली आहे.

विनायक मेटेंनीही केली टीका

छत्रपती संभाजीराजे आणि शरद पवार यांच्या भेटीवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही टीका केली होती. “लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकतो. मात्र, शरद पवार यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही. मराठा आरक्षण, नोकऱ्या आणि सारथी या महत्वाच्या विषयांवरची चर्चा १० मिनिटांत कशी पूर्ण झाली? पण आता संभाजीराजे चर्चा सकारात्मक झाली, असे म्हणत असतील तर पुढे काय होते ते बघू,” असं म्हणत मेटे यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation chhatrapati sambhaji raje meeting political leaders nilesh rane taunt bmh
First published on: 28-05-2021 at 11:39 IST