Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांच्यासह हजारो कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. आज सकाळी हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत आले. मात्र आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात आंदोलकांची मोठी गैरसोय झाल्याची तक्रार आंदोलक करत आहेत. अनेक शौचालये, हॉटेल्स बंद ठेवल्याची तक्रार केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. तसेच सरकारला इशारा दिला.
पोलिसांनी मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलन करण्यासाठी केवळ एका दिवसाची परवानगी दिली होती. मात्र ही मुदत वाढविणार असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आंदोलनाला मुदत वाढ दिली की नाही, याबाबत मला कल्पना नाही. पण सरकारने असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा असली डाव खेळावा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “गोरगरीबांचे मन जिंकण्याची उत्तम संधी सरकारकडे आहे. मराठे सरकारला कधीही विसरणार नाहीत. आम्हाला आरक्षण मिळाले तर आम्ही सरकारचे आभार मानू. एक एक दिवस उपोषणाला मुदतवाढ देण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य कराव्यात.”
शौचालय, पाणी, हॉटेल बंद केल्यामुळे व्यक्त केला संताप
आंदोलकांना पाणी आणि जेवण मिळाले नाही, याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील शौचालये बंद केले आहेत. तसेच या परिसरातील चहाच्या टपऱ्या, खाण्यापिण्याची हॉटेल बंद केले आहेत. आंदोलकांना पाणीही मिळू नये, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे काही आंदोलक सीएसटी रेल्वे स्थानकात आसरा घेण्यासाठी गेले. सरकार इंग्रजांपेक्षाही बेकार झाले, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
मुंबईत जर आम्हाला अन्नपाणी बंद करणार असाल तर तुमच्याही सभा महाराष्ट्रात कशा होतील, हे आम्ही पाहू, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिले. तुमच्या सभांना, रेस्ट हाऊसला जाणाऱ्या पाईपलाईन बंद करू, असेही ते म्हणाले.

आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे किती दिवस आंदोलन चालणार? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आंदोलनाला एक दिवसाची परवानगी मिळाली होती. मात्र त्यांनी पुन्हा परवानगी मागितली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पोलीस पालन करतील. आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यातील हा प्रश्न आहे.
मराठा आंदोलकांनी जेवणाची स्वतःच व्यवस्था केली असून टेम्पोमधून जेवण बनविण्याचे साहित्य आणि बॅगा घेऊन मुंबई गाठली आहे. तर अनेकजण महिनाभराचा शिधा, भांडी असे सर्वच साहित्य सोबत आणले आहे. बहुसंख्य मराठा आंदोलकांनी टेम्पोमध्येच खिचडी, तसेच चहा तयार केला. अनेकजण घरून आणलेली चटणी – भाकर खात होते. तर काहीजण मोठ्या प्रमाणात बिस्कीटचे पुडे व फरसाणची पाकिटे घेऊन आले आहेत. हा सुका खाऊ घेण्यासाठी मराठा आंदोलकांची झुंबड उडाली होती.