सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती ढासळली असताना इकडे सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलकांनी भाजपचे आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख व काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आक्रोश केला. ठिय्या मारत लोकप्रतिनिधींना जाब विचारला. तथापि, मुंबईत असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर गाऱ्हाणे मांडत असताना गैरसमजुतीतून वाद निर्माण झाला होता.
मराठा सकल क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर प्रथम काळजापूर मारूती मंदिराजवळील भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्या निवासस्थानासमोर धडक मारली व तेथे आक्रोश केला, त्यावेळी आमदार देशमुख घरातून बाहेर येऊन आंदोलकांना सामोरे गेले. माऊली पवार, प्रकाश वानकर, रवी मोहिते, हेमंत पिंगळे, मतीन बागवान आदींनी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर महायुती शासन अजूनही पूर्णतः न्याय देत नसल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. काही तरुणांनी आमदार देशमुख यांच्याशी वाद घातला. विशेषतः भाजपचेच नेते असलेले केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने करीत असल्याबद्दल आपली भूमिका मांडण्याची आणि भाजप श्रेष्ठींकडे तीव्र भावना पोहोचविण्याची मागणी आंदोलकांनी केली. तेव्हा आमदार देशमुख यांनी भाजपसह महायुती सरकारची भूमिका मराठा आरक्षण देण्याच्या बाजूने कायम असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा – सातारा लोकसभेसाठी अजित पवार आग्रही; महामेळाव्यातून रणशिंग फुंकणार!
हेही वाचा – शिवसेनेच्या महाअधिवेशनास उत्साही वातावरणात सुरुवात; सहा ठराव संमत
आमदार सुभाष देशमुख यांच्या गांधी नगराजवळील सह्याद्री गृहनिर्माण सोसायटीत बंगल्यावर मराठा आंदोलकांनी जाऊन तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सात रस्त्यावरील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या जनवात्सल्य बंगल्यावर आंदोलक धडकले. त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे मुंबईत होत्या. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर आंदोलकांनी संपर्क साधला असता, आपण आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष पूर्वीपासून मराठा आरक्षणाच्या बाजूने प्रामाणिकपणे उभा असताना आपल्याच घरासमोर आंदोलन कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा आंदोलकांनी गोंधळ घालत आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी वाद घातला. हे आंदोलन भाजपचे आमदार विजय देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्याही घरासमोर झाल्याचा खुलासा केल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांचा गैरसमज दूर झाला.