राज्यातील सर्व शाळांमध्ये मोहीम सुरू करण्याचे निर्देश; स्वयंपाकी महिला व मदतनीसांचाही समावेश
शालेय पोषण आहाराचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आधारसंलग्न नोंदणी फ सल्याने शिक्षण विभागाने परत ऐन उन्हाळयात नोंदणीचा फ तवा जारी करताना स्वयंपाक्यांचाही समावेश केला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये ही मोहीम आता सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने केंद्र शासनाच्या सूचनेअंती दिले. शालेय पोषण आहारातील विद्यार्थी तसेच आहार तयार करणाऱ्या स्वयंपाकी महिला व मदतनीस यांचेही आधार संलग्न बँक खाते अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व नोंदणीचा आढावा केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाचे मुख्य सचिव हे २८ ते ३० एप्रिल दरम्यान घेणार असल्याची ताकीदही संबंधित यंत्रणेला प्रथमच देण्यात आली आहे.
शालेय पोषण आहारातील विद्यार्थ्यांना होणारा पुरवठा काही भागात वादग्रस्त ठरला. तसेच स्वयंपाकी महिलेस दर महिना तीन हजार रुपये व मदतनीसास हजार रुपये मानधन आहे. हे मानधन देण्याबाबतही तक्रारी उद्भवल्या. या पाश्र्वभूमीवर आता नव्याने नोंदणी पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे. महिन्याभरापूर्वीच या योजनेसाठी राज्य शासनाने एक स्वतंत्र विभाग स्थापन करीत योजनेचे गांभीर्य स्पष्ट केले होते. योजनेतील दोन्ही कर्मचाऱ्यांचे मानधन बँक खात्याद्वारेच करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. पण तसे होत नसल्याचे दिसून आले.
या पाश्र्वभूमीवर या योजनेतील प्रत्येकाचे आधारकार्ड अनिवार्य ठरल्यानंतर नोंदणी मोहिमेचा फ तवा निघाला. २४ एप्रिलपर्यंत ही माहिती देणे क्रमप्राप्त आहे. आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती तालुकानिहाय प्रत्येक शाळेतून संकलित करायची आहे. त्याची माहिती एमडीएम पोर्टलवर टाकल्यानंतर परत नोंदणी करावी. शाळांना उन्हाळी सुट्टी लागणार असल्याने एप्रिलमधेच प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. आधारकार्ड नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे कार्ड काढण्याचेही काम याच महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. विशेष म्हणजे बंॅक खात्याबाबत १०० टक्के काम पूर्ण न झाल्याबद्दल आक्षेप आहे. शालेय पोषण आहार योजनेची देयके मंजूर करीत अनुदान वितरित करण्यासाठी शाळांच्या बँक खात्याची माहिती अद्यावत करण्याबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले होते. ते अपूर्णच असल्याने संबंधित बँॅकेकडून परत खातरजमा करण्याची सूचना आहे. त्यासाठी विद्यार्थी, स्वयंपाकी व मदतनीस यांच्या बंॅक पासबुकाच्या झेरॉक्स प्रती जोडून पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा मुख्य सचिव या उपक्रमातील सर्व नोंदणीचा आढावा पुणे दौऱ्यात स्वत: घेणार असल्याने शिक्षण विभागाची लगीनघाई सुरू झाली आहे. रणरणत्या उन्हात शाळा शिक्षक व मुख्याध्यापक याच कार्यावर लक्ष केंद्रित करून बसल्याचे चित्र पुढे येते. विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सतीश जगताप म्हणाले, आधार नोंदणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, झालेल्या नोंदणीत त्रुटी आहेत. मुलांचे नाव, जन्मतारीख, पत्ता यात गोंधळ आहे. त्यामुळे तेच काम परत करावे लागणार. शाळेतील आधारची व बँक खात्यावरील संपूर्ण माहिती एकच असावी, हा या मागचा उद्देश आहे.