अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेमध्ये फूट पडली असून काही शाखांनी संस्थेपासून वेगळे होण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. संस्थेचे माजी उपाध्यक्ष माधव राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वात्मक मराठी बालसाहित्य महामंडळ महाराष्ट्र पुणे या राज्यव्यापी संस्थेचे संलग्नत्व मान्य करून वेगळी चूल मांडण्यास काही शाखांनी पाठिंबा दर्शविला आहे. तर, काही सदस्यांनी निवडणूक प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

बालकुमार साहित्य संस्थेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक प्रक्रिया घटनाबाह्य पद्धतीने राबविण्यात येत असल्याचा आक्षेप काही सदस्यांनी घेतला. उदगीर, नांदेड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि सातारा या संस्थेच्या सहा शाखांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आल्यामुळे शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. संस्थेला मदत करूनही आम्हालाच मतदानातून डावलण्यात आल्याचा सूर शाखांनी आळविला आहे. दरम्यान, काही सदस्यांनी संस्थेने राबविलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. माधव राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वात्मक मराठी बालसाहित्य महामंडळ, महाराष्ट्र या राज्यव्यापी संस्थेशी संलग्नत्व स्वीकारून वेगळी चूल मांडण्यास काही शाखांनी पाठिंबा दर्शविला आहे.

विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळे नियमानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करून नवीन कार्यकारिणी स्थापित करावी, हा माझा आग्रह होता. घटनेनुसार निवडणूक झाली नाही. त्यामुळे निवडून आलेली कार्यकारिणी अवैध आहे. मतदानाचा अधिकार डावलल्यामुळे शाखेच्या सदस्यांनी मूळ संस्थेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

माधव राजगुरू, संस्थेचे माजी उपाध्यक्ष

संस्थेच्या सर्वसाधारण सभेत शाखांना नाकारण्यात आलेला मतदानाचा अधिकार अन्यायकारक आहे. भिलार येथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनामध्ये आमचा सर्वतोपरी सहभाग होता. त्यामुळे शाखांनाच मतदानाचा अधिकार नाकारणे हे चुकीचे आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिल्पा चिटणीस, अध्यक्ष, सातारा शाखा