Marathi Protest in Mira Bhayandar MNS Raju Patil Reacts : मीरा-भाईंदरमध्ये सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा वाद चालू आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शहरामधील परप्रांतीय दुकानदारांनी, व्यावसायिकांनी मीरा-भाईंदर बंदची हाक दिली होती. तसेच मोर्चा देखील काढला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज शहरातील मराठी भाषिकांनी मराठी एकीकरण समिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली शहरात मोर्चा काढायचं ठरवलं होतं. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. तसेच, पोलिसांनी मनसे नेते, मराठी एकीकरण समितीचे सदस्य व अनेक आंदोलकांची धरपकड केली. यामुळे मराठी भाषिक अधिक आक्रमक झाल्याचं पाहिलं.

परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी देणाऱ्या गृहविभागाने मराठी भाषिकांच्या मोर्चाला मात्र परवानगी दिली नाही. त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला. अशातच परिवहन मंत्री व शिवसेनेचे (शिंदे) नेते प्रताप सरनाईक हे सरकारविरोधात जाऊन या मोर्चात सहभागी झाले. यावरून मराठी भाषिकांच्या मोर्चाबाबत सरकारमध्ये एकमत नसल्याचं दिसत असल्याची टिप्पणी मनसेने केली आहे.

मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी यावरून एक सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “एकंदरीतच मीरा-भाईंदरमधील मराठी मोर्चासाठी परवानगी देण्यावरून सरकारकडून ज्या प्रकारे प्रतिक्रिया येत आहेत व सरकारमध्येच दोन पक्षात जो गोंधळ चालू आहे तो शिंदे-फडणवीस अंतर्गत वाद तर नाही? की आंदोलन अधिक उग्र होताना दिसत आहेत म्हणून या उलट्या बोंबा आहेत?”

प्रताप सरनाईकांना आंदोलकांचा विरोध

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मराठी अस्मितेसाठी चालू असलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेले असता आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘५० खोके.. एकदम ओके…’, ‘गद्दार तुम्ही परत जा’ अशा घोषणा देत गोंधळ घातला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संदीप देशपांडेंचा परप्रांतीयांना इशारा

दरम्यान, या मोर्चातून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुजोर परप्रांतीयांना इशारा दिला. ते म्हणाले, “मराठी माणसाला माज दाखवायचा प्रयत्न कराल तर कानाखाली आवाज काढू. तुम्ही व्यापार करायला आलेले आहात, गपचूप व्यापार करा. २ हजार मैलांवरून इकडे यायचं आणि इथल्या मराठी माणसाला माज दाखवायचा हे प्रकार खपवून घेणार नाही”