नवी दिल्ली : ‘आमचा विठोबा सगळ्यांना आपल्या पदराखाली, सावलीखाली घेणारा आहे. या संतांमध्ये अंत्यज म्हणजे आपण बीसी-ओबीसी म्हणतो, ही सगळी मंडळी त्याची परमभक्त आहेत. ही मंडळी कुठल्याही शाळेत शिकलेली नाहीत. त्यांना कोणीही शिकवलेले नाही, तरीही ते मराठीत काव्य करत होते. याचा अर्थ मराठी फक्त लिखित नाही तर ती बोलीतून निर्माण झाली, या सगळ्या बोलींचे हे संमेलन आहे,’ असा अत्यंत सोप्या-ओघवत्या भाषेत लोककलेच्या अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि यंदाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या अभिजातपणाचे मूळ उलगडून दाखवले.

दिल्लीतील विज्ञान भवन येथे शुक्रवारी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या या पहिल्या सत्रात भवाळकर यांनी अध्यक्षीय नाही पण, उद्घाटनाचे मार्मिक भाषण दिले. ‘शंभराला दोन कमी अशा ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आपण भेटत आहोत, हीच अभिजात भाषा आहे. निरनिराळ्या बोली आपण बोलत आलो आहोत, या सगळ्या बोलींचे हे संमेलन आहे’. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचा संदर्भात देत भवाळकर म्हणाल्या की, मराठी भाषा संतांनी टिकवली. मराठीला अभिजातपण लाभले ते संतांमुळे! पंतप्रधान मोदींना आपण विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट दिली तो विठ्ठल महाराष्ट्राचे दैवत आहे. हे आमच्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहे. हा विठ्ठल आला कुठून? हा आला कर्नाटकमधून, महाराष्ट्र स्थिर झाला. हा विठ्ठल मराठी माणसासारखा साधा आहे, कष्टकरी माणसासारखा आहे. गोऱ्या रंगाची त्याला हौस नाही, तो सावळाच आहे. नुसता सावळा नाही तर तो काळासावळा आहे. तो सर्वांना सांभाळून घेणारा आहे. या विठ्ठलाचे भक्त सर्व जातीजमातीतील आहेत. त्यात व्यवसाय करणारी मंडळी म्हणजे सुतार, लोहार, चांभार आहेत. गावाकुसाबाहेरची मंडळी आहेत. उच्चवर्णीय संत एकनाथ आहेत आणि सर्वांचे शिरोमणी संत ज्ञानेश्वर आहेत. मराठी अभिजात झाली त्याची पायाभरणी करणारी ही संत मंडळी आहेत!

भाषा हे संस्कृतीचे बलस्थान

‘संमेलनाचा हा आनंद पुढील तीन दिवस सगळ्यांच्या संगतीमध्ये घेणार आहोत. आपण एकमेकांचे मैत्र जोडून पुढे जाणार आहोत. कारण ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे, हे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे!’ भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. आजही जगभरात कुठेही हिंडत असलो आणि मराठी शब्द ऐकले तर आपण चमकून बघतो. भाषा आपलेपण निर्माण करते, भाषा एकमेकांना जोडणारी असली पाहिजे, तोडणारी नाही, असे भवाळकर म्हणाल्या.

भाषा बोलली तरच जिवंत!

भाषा प्रत्यक्ष जीवनात असावी लागते, त्याला जैविक ओळख आहे, भाषा नुसती पुस्तकातून, ग्रंथांतून जिवंत राहात नाही, ती बोलली तरच जिवंत राहते, असे सांगताना भवाळकर म्हणाल्या,‘अमुक साली शाळा निघाल्या आणि माणसं शिकायला लागली हे आधुनिक पांडित्य झालं पण, ज्या दिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्यादिवशी मराठी भाषा जन्माला आली असे म्हणता येईल.’

आमचे संत पुरोगामी…

आज ज्याला आपण पुरोगामी म्हणतो आणि कोणी उपहासाने ‘फुरोगामी’ म्हणतात, ते काही म्हणू देत. आमचे संत पुरोगामी आहेत. स्त्री या संमेलनाची अध्यक्ष झाली हा महत्त्वाचा मुद्दा नाही, गुणवत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असे विचार भवाळकरांनी मांडले.

संमेलनाध्यक्षपदी निवडीबद्दल कृतज्ञता

● दिल्लीत ७० वर्षांपूर्वी मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्याचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अध्यक्ष होते. त्यावेळी काकासाहेब गाडगीळ संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. यावेळी शरद पवार स्वागताध्यक्ष आहेत. पवारांनी संमेलनाच्या अध्यक्ष यादीत माझे नाव घेतले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● आज योगायोग असा की, लक्ष्मणशास्त्री जोशींच्या जागी मला उभे राहण्याचे भाग्य मिळाले, ज्यांनी ती इच्छा व्यक्त केली ते शरद पवार स्वागताध्यक्ष आहेत. शिवाय, देशाचे पंतप्रधान संमेलनाचे उद्घाटन करत आहेत, या आनंदाच्या गोष्टी आहेत, अशा शब्दांत भवाळकरांनी संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.