कोल्हापूर : बेळगावात शनिवारी काळा दिन मिरवणुकीला मराठी भाषकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. धर्मवीर संभाजी उद्यान येथून फेरीला सुरुवात झाली. काळी वस्त्रे , काळे झेंडे, हात, तोंडाला काळया फिती बांधून अबालवृद्ध भव्य मूक फेरीत एकजुटीने सहभागी झाले आहेत. कर्नाटक राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ साली  झाली. याच्या विरोधात बेळगावसह सीमाभागात हा दिवस काळा दिन म्हणून पाळून निषेध व्यक्त केला जातो. याला रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, बेळगावचे माजी महापौर मालोजी अष्टेकर,  एकीकिरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांना खबरदारीसंदर्भात नोटीस बजावली होती.

पोलीस प्रशासनाने बजावलेल्या नोटिसीला मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे व मालोजी अष्टेकर यांनी उत्तर दिले होते. कितीही अरेरावी, हुकुमशाही झाली तरी १ नोव्हेंबर रोजी काळया दिनी सायकल फेरी निघणारच, असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला होता.त्यानुसार आज सकाळी बेळगावात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, म.ए. समिती महिला आघाडी, बेळगाव शिवसेना सीमाभाग, मराठी युवा मंच युवा आघाडी आदी संघटनांचे कार्यकर्ते, मराठी बांधव काळा दिन मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

धर्मवीर संभाजी उद्यान येथून फेरीला सुरुवात झाली. बेळगाव ,निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या जात होत्या . मागण्यांचे फलक हाती घेण्यात आले होते. चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगांव मध्ये दैनंदिन व्यवहार बंद ठेवले. काळी वस्त्रे , काळे झेंडे, हाताला आणि तोंडालाही काळया फिती बांधुन अबालवृद्ध भव्य मूक फेरीत एकजुटीने सहभागी झाले होते. महाराष्ट्रात जाण्याच्या जिद्दीचे दर्शन घडवत हजारो मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले.

काळा दिनाबाबत शहर आणि परिसरात जागृतीचे काम महाराष्ट्र एकीकरण समितीने हाती घेतल्याने फेरीला मोठ्या प्रतिसाद मिळाला.आजच्या या निषेध फेरीतुन सीमाबांधवांनी आपली एकजुट दाखवून दिली.प्रकाश मरगाळे यांनी सांगितले की, गेली सात दशके बेळगावसह सीमा भाषिक महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाने लढत आहे. सीमाभागातील मराठी बांधवांचा कितीही अन्याय, अत्याचार झाले तरी लढण्याचा निर्धार कायम आहे. तो आज या काळा दिनी पुन्हा एकदा दिसून आला.