Maharashtra Monsoon 2025 Updates मुंबई : मोसमी पावसाच्या हंगामात (जून ते सप्टेंबर) यंदा संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात कोसळलेल्या पावसामुळे राज्यातील सरासरी ओलांडली आहे. दरम्यान, यंदा मराठवाड्यात सर्वाधिक ३९ टक्के पावसाची, तर मध्य महाराष्ट्रात २० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
१ जून ते ३० सप्टेंबर हा मोसमी पावसाचा हंगाम मानला जातो. यंदा पहिल्या दोन महिन्यांत पावसाचे वितरण असमान असले तरी सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसामुळे राज्यात पावसाने सरासरी ओलांडली. सप्टेंबर महिन्याच्या मध्यात पडलेल्या पावसामुळे अनेक भागात अतिवृष्टी झाली. दरम्यान, १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तेथे ३९ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला. या कालावधीत मराठवाड्यात ६४२.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा ८९७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्रात २० टक्के पावसाची नोंद झाली. तेथे ७४७.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा ८९७.३ मिमी पाऊस पडला आहे. याचबरोबर कोकण- गोवा भागात १५ टक्के अधिक, तर विदर्भात १४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात यंदा १२० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात ११८९.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी राज्यात १२५२.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच २६ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला होता. सलग दुसऱ्यांदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाब क्षेत्रामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. राज्यात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. मुंबईतही अशीच परिस्थिती आहे. मुंबईत गुरुवारी हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत १३.८ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ०.४ मिमी पावसाची नोंद झाली.
एल -निनो स्थिती
विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या तटस्थ ‘एल-निनो’ स्थिती आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ‘ला-नीना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. तर हिंद महासागरात ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) स्थिती सध्या सौम्य ऋण (निगेटिव्ह) स्थितीत असून, हंगामात ‘ऋण’ आयओडी कायम राहणार आहे.
ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस
ऑक्टोबर महिन्यात देशात अधिक पावसाची शक्यता आहे. या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ११५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशात ७५.४ मिलिमीटर पाऊस पडतो. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.