लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : दसरा आणि झेंडूची फुले यांचे समीकरण असल्यामुळे दसरा सणासाठी सोलापुरात झेंडू फुलांची आवक झाली आहे. झेंडूची आवक असल्यामुळे किरकोळ बाजारात प्रतिकिलो शंभर ते दीडशे रूपयांचा भाव झेंडूला आला आहे. यंदा करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर  सगळेच सण-उत्सव साध्या पध्दतीने साजरे होत आहेत. त्यातच अलीकडेच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झेंडू फूल शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांची आवक खूपच घटली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे झेंडूचा दर दसरा सणाच्या पूर्वसंध्येला दीडशे रुपये किलो पर्यंत पोहचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापुरातल्या मारुती मंदिर परिसरात फुलांचा बाजार भरतो. तेथेच पूजा साहित्याचीही विक्री होते. संध्याकाळी फुलांच्या बाजारात फुलांसह पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. वाढती मागणी पाहता झेंडू दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असला तरी त्याचे भय कायम आहे. त्यामुळे सारे सण-उत्सव साध्या पध्दतीनेच साजरे होत आहेत. त्यामुळे सजावट, घरातील पूजा आणि पुष्पहारांसाठी भक्त आणि मंदिरांमध्ये झेंडू फुलांचा वापर दसरा सणामध्ये होतो. परंतु करोना प्रादुर्भावामुळे सर्व देवस्थाने बंदच आहेत. परिणामी झेंडूला अपेक्षित मागणी दिसत नाही. तथापि, घरगुती पूजेसाठी झेंडू फुलांना भाव आहे.
शहरात यंदा सुमारे ४० हजार किलो फुलांची आवक झाली असून सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, करमाळा, उत्तर सोलापूर आदी भागासह पुणे, नगर व इतर जिल्ह्यांतून झेंडू फुलांची आवक झाल्याचे फुल व्यापाऱ्यांनी सांगितले.

झेंडू फुलांप्रमाणेच केळीच्या खुंटांना दसरा सणात धार्मिक पूजा विधीसाठी मान असतो. अतिवृष्टीने केळीच्या बागांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. परिणामी, बाजारात विक्रीसाठी केळीचे खुंट कमी प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. केळीचे खुंटीचे एक संच ६० रूपयांस खरेदी केले जात होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marigold flowers cost rs 150 per kg in solapur scj
First published on: 24-10-2020 at 19:59 IST