नांदेड : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर परिसरात शहीद झालेले जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या पार्थिवावर गुरुवारी मूळ गाव असलेले तमलूर (ता. देगलूर) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नांदेड जिल्हा प्रशासनाने लष्कराच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. हैदराबाद मार्गे शहीद सचिन वनंजे यांचे पार्थिव येथे आणण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.

सचिन वनंजे २०१७ मध्ये भारतीय लष्करात दाखल झाले. महाविद्यालयीन जीवनापासून जिद्दी, अभ्यासू व एनसीसीमध्ये कार्यरत होते. सुरुवातीच्या काळात त्यांची पहिली नियुक्ती सियाचीन भागात झाली होती. त्यानंतर पंजाबमधील जालंधर येथे सेवा बजावल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून ते जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर भागात कर्तव्यावर होते. ६ मे रोजी ते प्रवास करत असलेले लष्कराचे वाहन ८ हजार फूट खोल दरीत कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आठ महिन्यांची मुलगी, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.