लोकसत्ता ऑनलाइन, सातारा
छत्रपती शिवरायांच्या दैदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगड ३५९ मशालींनी उजळून निघाला. प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरास ३५९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी एक मशाल वाढवून मशाल महोत्सव साजरा केला जातो. यावेळी मशालीच्या उजेडात किल्ले प्रतापगडाचं रुप अगदी उजळून निघालं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवरात्रोत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद लुटला. हा तेजोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांमधून हजारो भाविकांनी प्रतापगडावर हजेरी लावली होती.

भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान ढोल ताशांच्या गजरात ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला. हा कार्यक्रम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी नगारे, तुतारी, सनई तसेच प्रतापगडावरील प्रसिद्ध स्वराज्य ढोल ताशा पथक व लेझीमच्या गजरात भगवे झेंडे फडकावत मशाली पेटून महोत्सव साजरा झाला. फटाक्यांची जोरदार आतषबाजीही करण्यात आली. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवला.

प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भवानी माता मंदिरापासून बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड उजळून निघाला. या नयनरम्य नजराण्यामुळे जणू शिवकाळच अवतरला असल्याचा भास होत होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mashal mahotsav on pratapgad satara sgy
First published on: 02-10-2019 at 13:19 IST