जुलै २०२३ मध्ये अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाली होती. कारण शरद पवारांनी या फाटाफुटीनंतर जी पत्रकार परिषद घेतली त्यात छगन भुजबळ तिकडे काय चाललं आहे हे बघून येतो म्हणाले आणि मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे हशाही पिकला होता.

छगन भुजबळ यांची पुन्हा चर्चा

या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भुजबळ चर्चेत आहेत. अजित पवारांवर जी टीका संघाच्या मुखपत्रातून करण्यात आली त्यांनी ते योग्य असल्याचं म्हटलं आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून त्यांची जी वक्तव्यं समोर येत आहेत त्यावरुन भुजबळ महायुतीत नाराज असल्याचं बोललं जातं आहे. ते शरद पवारांबरोबर जातील अशाही चर्चा आहेत. याबाबत आता त्यांनीच उत्तर दिलं आहे. तसंच राज्यसभेबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- अजित पवारांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळ नाराज आहेत?; उत्तर देत म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो..”

काय म्हणाले छगन भुजबळ?

“मी राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होतो. मात्र पक्षाने माझ्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड केली. मी ज्यांना शाखाप्रमुख केलं होतं असे लोक संसदेत गेले, मंत्री झाले. ४० वर्षे काम केल्यानंतर राज्यसभेवर जायची इच्छा होती. मात्र आता पक्षाने जो निर्णय घेतला तो मान्य आहे.” असं छगन भुजबळ म्हणाले. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे उत्तर दिलं आहे. तसंच शरद पवारांचं बोट पुन्हा धरणार का? या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल, “बाळासाहेब आणि तुमचं रक्ताचं नातं, मग तुम्ही..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांचं बोट धरणार का?

छगन भुजबळ यांना यावेळी अजित पवार गटात येण्याचा निर्णय चुकला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “तुम्हाला वाटत असेल पण मला वाटत नाही असं भुजबळ म्हणाले. तसंच सहानुभूतीबाबत मी जे बोललो. ते मतपेटीने दाखवून दिलं”, अशी प्रतिक्रिया दिली. शरद पवार गटाकडे जाण्याचा दरवाजा उघडा ठेवलाय का? असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला तेव्हा, “असं तुम्हाला वाटतं. हा तुमचा प्रचार आहे. या सर्वात मी नेहमी सत्याची बाजू घेत आलो आहे. मला जे वाटतं खरं आहे, तेच बोलतो. मला वाटलं की या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे. तेव्हा सांगतो मला उत्तर नाही द्यायचं. असं काही नाही. ना माझी खिडकी उघडी आहे ना माझा दरवाजा उघडा आहे. ना कोणी माझ्यासाठी रेड कार्पेट टाकलं आहे, असं काही नाही. वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन पुढची पावलं टाकायची आहे. त्यातून काही धडा घ्यायचा आहे. पक्षाला आणि युतीला. ज्या त्रुटी आहे, त्या दूर करायच्या आहेत. मी आहे त्या पक्षात युतीसोबत राहणार”, असं स्पष्ट उत्तर दिलं आहे.