कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या वैशाली राजेंद्र डकरे यांची शनिवारी निवड करण्यात आली. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. ही सभा संपल्यानंतर काँग्रेसचे उपमहापौर मोहन गोंजारे यांनी पदाचा राजीनामा दिला असून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची वर्णी लागणार आहे. मावळत्या महापौर तृप्ती माळवी यांचे महापौरपद रद्द केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर ६ जुल रोजी निर्णय घेणार असल्याचे सांगितले असून न्यायालयाच्या या निर्णयावर डकरे यांचे महापौरपदाचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.
जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीच्या तत्कालीन महापौर तृप्ती माळवी यांनी १६ हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. रंगेहाथ पकडल्या गेलेल्या माळवी यांनी राजीनामा द्यावा यासाठी मोठे जनआंदोलन उभारले होते. त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. राज्य शासनाने पंधरवडय़ापूर्वी माळवी यांना महापौरपदी अपात्र ठरविले होते. त्यानंतर नव्या महापौर निवडीचा कार्यक्रम सुरू झाला. त्यामध्ये वैशाली डकरे यांचा एकमेव अर्ज होता. तथापि ही निवड शनिवारी झालेल्या विशेष सभेत जिल्हाधिकारी सनी यांनी घोषित केली. डॉ. सनी यांनी नूतन महापौर वैशाली डकरे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तर महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असली तरी मिळालेल्या कालावधीत शहराच्या विकासासाठी भरीव काम करणार असल्याचे डकरे यांनी सांगितले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होऊन त्या दिशेने काम व्हावे यास आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान महापौर निवडीचा कार्यक्रम संपल्यानंतर उपमहापौर मोहन गोंजारे यांनी राजीनामा दिला आहे. उपमहापौरपद काँग्रेस पक्षाकडे होते. महापालिकेतील सत्तासूत्रानुसार या सभागृहातील अखेरचे महापौरपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. या पदावर डोळा असलेल्यांनी आपली वर्णी लागावी यासाठी पक्षनेत्यांकडे संपर्क चालविला आहे. तर महापौर निवडीनंतर डकरे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत सवाद्य मिरवणूक काढली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2015 रोजी प्रकाशित
कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या वैशाली डकरे
कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या वैशाली राजेंद्र डकरे यांची शनिवारी निवड करण्यात आली. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

First published on: 05-07-2015 at 02:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor of kolhapur congress vaishali dakare