Crime News MBBS च्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना सांगलीत घडली आहे. या प्रकरणात दोन विद्यार्थ्यांसह त्यांच्या मित्रांना अटक केली आहे. पोलिसांनी एकूण तीन जणांना या प्रकरणात अटक केली आहे. पुणे, सोलापूर आणि सांगली अशा तीन ठिकाणचे हे तरुण आहेत. या तिघांनाही २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी याबाबत काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता एका महाविद्यालयात एमबीबीएसचं शिक्षण घेते. तिच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या काही मुलांशी तिची ओळख झाली आणि मैत्रीही झाली. या तिघांनी तिला आपण सिनेमा पाहण्यासाठी जाऊ असं सांगितलं. त्यावेळी तिला बाईकवरुन वान्लेसवाडी या ठिकाणी फ्लॅटवर नेलं. तिथे तरुणीला कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यानंतर या तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर काही वेळाने तरुणी शुद्धीवर आली. त्यानंतर या तरुणीने पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी काही तासांमध्ये तिघांना अटक केली.
विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिघांना केली अटक
सांगलीत घडलेली ही घटना जेव्हा या मुलीच्या आई वडिलांना समजली तेव्हा ते देखील पोलीस ठाण्यात पोहचले. सांगलीतल्या विश्राम बाग पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. ज्या तिघांनाही अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात सामूहिक बलात्काराची कलमं लावण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेले तिघेही २० ते २२ वर्षे वयोगगटातील आहेत. या मुलीवर जेव्हा या तिघांनी बलात्कार केला तेव्हा तिला धमकावण्यातही आलं होतं. कुठेही वाच्यता करु नकोस असं तिला बजावलं होतं. मात्र या मुलीने हिंमत दाखवली आणि तिन्ही तरुणांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी काही तासांमध्येच तिघांनाही अटक केली. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.