वाई : साताऱ्यातील मटका आणि खाजगी सावकारीद्वारे समाज व्यवस्था बिघडवणार्या मटकाकिंग समीर कच्छीसह त्याच्या ४६ साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
मागील अनेक वर्षांपासून समीर ऊर्फ शमीम सलीम शेख ऊर्फ कच्छी हा आपल्या मटका व अवैध खासगी सावकारीद्वारे साताऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण करीत होता. अनेक खटले दाखल असलेला कच्छी हा आपल्यावरील खटल्यांना घाबरून न जाता पुन्हा जोमाने आपले अवैध धंद्यांचे साम्राज्य वाढवितच होता. त्याला काही काळ हद्दपारही करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणार्या गुन्हेगारांविरुद्ध मोक्का अन्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना सूचना दिलेल्या आहेत.
कच्छी हा त्याच्या कच्छी गँगच्या साथीदारांमार्फतीने लपूनछपून अवैध धंदे चालवत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी १९ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याच्या राहत्या घरी छापा टाकला असता त्या ठिकाणी समीर कच्छी व त्याचे साथीदार मटका, जुगार चालवित असताना दिसून आले होते. त्यांच्याकडून एकूण १६ लाख २६ हजार ७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा – रेल्वे मालगाडीच्या इंजिनवर आढळला बिबट्याचा मृतदेह; वन व रेल्वे खात्यात खळबळ
तपासामध्ये कच्छी गँगचे साताराबाहेर गोवा कनेक्शन असल्याचे समोर आल्याने मडगांव येथून त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख ३९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी या टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करून पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला. त्यांनी या गुन्ह्यास मोक्का कायद्यान्वयेची कलम वाढ करण्याची परवानगी देऊन प्रस्तावास मंजुरी दिली. गुन्ह्याचा तपास गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण कॅम्प कोरेगाव यांच्याकडे देण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून पाच मोक्का प्रस्तावांमध्ये ९० जणांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत, तसेच अकरा इसमांविरुद्ध हद्दपारी व एका इसमास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे.